प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी जिममध्ये व्यायाम करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान राजू यांचे मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी (Ahsaan Qureshi) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू नीट काम करत नसल्याचं एहसान कुरेशी यांनी सांगितलं आहे.
एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एहसान कुरेशी म्हणाले, “डॉक्टरांनी कुटुंबीयांना राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अद्याप प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे, कारण ते सध्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. काही तासांपूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की राजू यांनी काही हलक्या हालचाली केल्या आहेत. पण त्यांचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाहीये किंवा प्रतिसाद देत नाहीये.”
एहसान कुरेशीने असंही सांगितलं की, त्यांना दिल्लीला जाऊन राज श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घ्यायची होती, परंतु राजू यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास नकार दिला. एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास मनाई केली आहे. कारण रुग्णालयातील डॉक्टर त्यांना अधिक लोकांना भेटू देत नाहीयेत. कुरेशी म्हणाले की, त्यांचे काही मित्र दिल्लीत आहेत, जे त्यांना राजूच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी अपडेट्स देत आहेत.
राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी व्यायाम केला होता. त्याच दिवशी ते पुन्हा एकदा वर्कआऊट करायला गेले तेव्हा त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांच्या ट्रेनरने त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं, जिथे डॉक्टरांनी विलंब न करता त्यांना CPR दिला. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.