मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत केव्हा आणि कोणता नवीन ड्रामा चाहत्यांसमोर घेऊन येईल, याचा काही नेम नाही. कधी लग्नामुळे तर कधी घटस्फोटामुळे चर्चेत असलेल्या राखीने आता भर पावसात नवीन नाटक केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चार वर्षांत दोन वेळा लग्न आणि पतीपासून विभक्त होणारी राखी आता पुन्हा एकदा नवऱ्यासाठी नवस करत आहे. या व्हिडीओमध्ये राखी पावसात उभी राहून आपल्या डोक्यावर अंडी फोडत देवाकडे नवऱ्याची मागणी करताना दिसतेय.
राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या ड्रामामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने म्हटलं होतं की आता तिला लग्न करायची इच्छा नाही. लकी नावाच्या व्यक्तीचं नाव तिच्याशी जोडलं जात होतं. आधी स्वत: राखीने माध्यमांना हिंट दिली आणि नंतर सांगितलं की लकी फक्त तिचा मित्र आहे. यानंतर आता राखीचा नवीन कारनामा समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राखी जिमच्या कपड्यांमध्ये पावसात भिजताना दिसतेय. ‘लवकर नवरा मिळू दे, चांगला नवरा मिळू दे’ असं म्हणत तिने स्वत:च्या डोक्यावर पाच अंडी फोडली. पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून दुबईत राहतेय. नुकतीच ती भारतात परतली आहे. भारतात परतताच तिचे दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. एका व्हिडीओमध्ये ती अनवाणी चालताना दिसली. यामागचं कारण विचारलं असता अभिनेता सलमान खानच्या लग्नासाठी नवस करत असल्याचं अजब कारण तिने दिलं. “माझा नवस आहे, मी श्रीलंका, दुबईहून अनवाणीच आले आहे. सलमानच्या लग्नासाठी मी हा नवस करतेय”, असं ती म्हणाली.
राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केल्यानंतर काही महिन्यांनीच त्याच्यावर गंभीर आरोप केले. आदिल सध्या तुरुंगात असून राखीने त्याच्यावर जीवे मारण्याचाही आरोप केला होता. एका कॉन्ट्रॅक्ट किलरला त्याने सुपारी दिल्याचा खुलासा राखीने केला होता.