मुंबई: टेलिव्हिजनची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी याच्यासोबतचे तिचे लग्नाचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखीने आदिलसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारल्याचंही म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर तिने राखी हे नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवल्याचीही चर्चा आहे. या सर्व चर्चांवर आता राखीचा भाऊ राकेशची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राखी सावंतच्या लग्नाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या मॅरेज सर्टिफिकेटनुसार तिने लग्नानंतर राखी हे नाव बदलून फातिमा असं ठेवलं आहे. यावर राखीच्या भावाने मौन सोडलं आहे. राखीच्या लग्नाबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं, असं त्याने म्हटलंय.
“राखीने तिचं नाव बदलल्याचं आम्हाला माहीत नाही. कारण हा पती-पत्नी यांच्यातील खासगी प्रश्न आहे. पण राखीने जर काही केलं असेल तर विचार करूनच केलं असेल. तिने तिच्या हिशोबाने केलं असेल”, असं राकेश म्हणाला.
“आम्ही सर्वजण चिंतेत आहोत. राखी सर्वांत लहान आहे आणि आयुष्यात ती बऱ्याच दु:खाला सामोरं गेली आहे. बिग बॉसमध्ये रितेशने तिचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हासुद्धा ती खूप चिंतेत होती. यावेळी तिने योग्यच निर्णय घेतला असेल”, असं तो पुढे म्हणाला.
राखीने मे 2022 मध्ये आदिलसोबत गुपचूप लग्न केलं होतं. तीन महिन्यांच्या डेटिंगनंतर या दोघांनी लग्न केलं. आदिलची बहीण आणि त्याचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते, म्हणून गुपचूप लग्न केल्याचं राखीने एका मुलाखतीत सांगितलं.
राखी आणि आदिलने इस्लामिक परंपरेनुसार लग्न केलं. त्यांच्या निकाह नामाचा (मॅरेज सर्टिफिकेट) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सर्टिफिकेटनुसार, राखी आणि आदिलने 29 मे 2022 रोजी लग्न केलं होतं. तिने तिचं नाव बदलून राखी सावंत फातिमा असं केल्याचंही त्यात पहायला मिळतंय.