मुंबई: अभिनेत्री राखी सावंत हिच्या आईचं निधन झालं आहे. आईच्या शेवटच्या काळात राखी आईसोबत होती. आईच्या निधनानंतर आईचा मृतदेह जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयातून कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. त्यावेळी राखीला मीडियासमोर अश्रू आवरणं कठिण झालं. आपला संकटकाळातील आधारवडच गेल्याने एकाकी पडलेल्या राखीने मीडियासमोरच टाहो फोडला. राखी जोरजोरात रडत होती. तिचा चेहरा रडून रडून सुकला होता. आई गेली… सलमान भाई, आई मला सोडून गेली… असं म्हणत राखी सावंत जोरजोरात रडत होती.
राखी सोबत तिची मैत्रीण संगिता कर्पूरे आणि तिचा भाऊ राकेश सावंतही उपस्थित होता. राखीने तिचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना आईसोबत रुग्णवाहिकेतून कुपर रुग्णालयात पाठवलं. काही पेपरवर्क करायचे होते, त्यामुळे ती मागे राहिली.
आज सकाळी राखीच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राखीच्या आईला कॅन्सर होता. आईचा इलाज करण्यासाठी पैशाची कमतरता पडू नये म्हणून ती बिग बॉसमध्ये गेली होती. राखी सावंतने बिग बॉसच्या 14 व्या सीजनमध्ये प्रवेश केला होता.
अनेक सर्जरीनंतर राखीच्या आईचा ट्यूमरचा कॅन्सरमध्ये बदल झाला होता. त्यांच्या संपूर्ण शरीरात कॅन्सर फैलावला होता. तब्बल दोन वर्ष त्या या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर त्या आयुष्याची लढाई हरल्या. आईसाठी राखीने लवकर विवाहही केला होता. तिचा पती आदिलनेही राखीसोबत लग्न केल्याचं जाहीरपणे मान्य केलं होतं.
राखी सावंत तिची आई जया भेडा यांच्या अत्यंत जवळ होती. राखीने लहान वयापासूनच कशी कुटुंबाची धुरा हाती घेतली होती, हे जया भेडा यांनी अनेकदा सांगितलं होतं. राखीसोबत त्या अनेक शोच्या मंचावर दिसल्या होत्या. जया भेडा या सुद्धा आपल्या बोलण्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायच्या. मात्र, गेल्या अडीच वर्षापासून त्या मीडियासमोर आल्या नव्हत्या. त्यांचा व्हिडीओही आला नव्हता.
आई आजारी असताना राखीने अनेकदा डॉक्टरांसह उद्योगपती मुकेश अंबानी यांचेही अनेकदा आभार मानले होते. मुकेश अंबानी यांनी राखी सावंतला अनेकदा आर्थिक मदत केली होती. राखीच्या आईला अखेरच्या काळात प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे त्या दोन महिने रुग्णालयात अॅडमिट होत्या.