हैदराबाद : RRR फेम अभिनेता आणि साऊथ सुपरस्टार रामचरणच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर रामचरण आणि त्याची पत्नी उपासना हे आई-बाबा झाले आहेत. हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात उपसनाने गोंडस मुलीला जन्म दिला. 19 जून रोजी तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (20 जून) उपासनाची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आली आहे. मेगास्टार चिरंजीवी हे आजोबा झाले आहेत. मुलीच्या जन्माची बातमी कळताच चाहत्यांनी रामचरण आणि उपासना यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रामचरण आणि उपासना हे सध्या हैदराबादमध्ये राहतात. मात्र बाळाच्या जन्मानंतर दोघांनी चिरंजीवी आणि सुरेखा यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना उपासना एका मुलाखतीत म्हणाली होती, “अनेकजण मुलंबाळं झाल्यानंतर घराबाहेर पडतात. पण आम्ही याविरुद्ध करतोय. आतापर्यंत आम्ही दोघंच राहत होतो. पण बाळाचा जन्म झाल्यानंतर आम्ही रामचरणच्या कुटुंबीयांसोबत राहणार आहोत. बाळासाठी आजी-आजोबाचं महत्त्व खूप असतं. हे मला आणि रामचरणला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आमच्या बाळालाही आजी-आजोबाचं भरभरून प्रेम मिळावं, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
रामचरण आणि उपासना यांनी 2012 मध्ये लग्न केलं. मात्र बाळाच्या निर्णयासाठी दोघांनी मिळून वेळ घेतला. अखेर लग्नाच्या 11 वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याआधी उपासना आई न होण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. या निर्णयावरून तिला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला होता. अध्यात्मिक गुरू सदगुरू यांच्याशी एका मुलाखतीत बोलताना ती आई न होण्याच्या निर्णयबाबत व्यक्त झाली होती.
रामचरणनेही याआधीही मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबद्दल वक्तव्य केलं होतं. गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेत राम म्हणाला होता, “मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा म्हणून चाहत्यांना खूश करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी फॅमिली प्लॅनिंग केल्यास माझ्या ध्येयापासून मी विचलित होऊ शकतो. उपासनाचीही तिच्या आयुष्यात काही ध्येयं आहेत. त्यामुळे आम्ही काही वर्षे मुलं न होऊ देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.”