निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये (Hyderabad) फसवणुकीचा (cheating) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा यांनी 56 लाख रुपये उधार घेतल्यानंतर त्यांची फसवणूक केल्याचा आरोप एका प्रॉडक्शन हाऊसच्या मालकाने केला आहे. याप्रकरणी मियापूर पोलीस ठाण्यात केस दाखल केल्याची माहिती पोलिसांनी ‘पीटीआय’ला दिली. 2019 मध्ये एका मित्राच्या ओळखीतून राम यांच्याशी भेट झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी ‘दिशा’ या तेलुगू चित्रपटासाठी 8 लाख रुपये उधारीने घेतल्याचं तक्रारकर्त्याने म्हटलंय. त्यानंतर पुन्हा त्यांनी 20 लाख रुपयांची मागणी केली. 22 जानेवारी 2020 रोजी चेकच्या माध्यमातून त्यांना पैसे उधारीने दिले. पुढील सहा महिन्यांत हे पैसे परत करणार असल्याचं आश्वासन राम गोपाल वर्मा यांनी तक्रारकर्त्याला दिलं होतं. पुढील काही महिन्यांत त्यांनी आणखी 28 लाख रुपये उधारीने घेतले.
“राम गोपाल वर्मा यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्या अकाऊंटमध्ये 28 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यावेळी त्यांनी दिशा या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी किंवा प्रदर्शनाच्या वेळी सर्व 56 लाख रुपये परत करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र जानेवारी 2021 मध्ये मला समजलं की राम गोपाल वर्मा हे दिशा या चित्रपटाचे निर्मातेच नव्हते”, असं तक्रारकर्ता म्हणाला.
बॉलिवूडमधील ‘सत्या’, ‘कौन’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘भूत’ यांसारख्या चित्रपटांसाठी राम गोपाल वर्मा ओळखले जातात. त्यांचा ‘खत्रा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आला होता. समलैंगिक नात्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं होतं. या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली होती.