मुंबई- अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘राम सेतू’ (Ram Setu) हा चित्रपट आज (25 ऑक्टोबर) रोजी प्रदर्शित झाला. ॲक्शन आणि ॲडव्हेंचरने परिपूर्ण असा हा थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अक्षयने एका पुरातत्व अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आर्यन कुलश्रेष्ठ असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. तर अभिनेत्री नुसरत भरूचा ही अक्षयची पत्नी गायत्रीच्या भूमिकेत आहे. जॅकलिन फर्नांडिसने यामध्ये पर्यावरण शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. मात्र दिग्दर्शकांनी या कथेत क्रिएटिव्ह लिबर्टीचा आधार घेत प्रेक्षकांसमोर सादर केली आहे.
अक्षयने या चित्रपटात नास्तिक पुरातत्व अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. मात्र कोणतीही छेडछाड न करता तो सत्य लोकांसमोर सादर करत असतो. जेव्हा सर्वोच्च न्यायालय भगवान रामाला काल्पनिक पात्र ठरवत रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंतचा राम सेतू तोडण्याचे निर्देश देतं, तेव्हा चित्रपटात अक्षयची एण्ट्री होते. या राम सेतूचं सत्य जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षाचा नेता अक्षयकडे एक मोहीम सोपवतो. राम सेतू हे सत्य आहे की कल्पना, हे सिद्ध करण्याचं काम अक्षयकडे असतं.
या चित्रपटातील सर्व कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत पार्श्वसंगीत, VFX, सिनेमॅटोग्राफी आणि CGI सुद्धा सर्वोत्तम आहे. समुद्राच्या आतील दृश्य CGI च्या साहाय्याने दाखवण्यात आले असून ती दृश्ये खरीखुरी वाटतात. यातील काही दृश्यांचं शूटिंग अत्यंत नयनरम्य ठिकाणी करण्यात आले आहेत.
अक्षय कुमारचा राम सेतू हा एक परफेक्ट दिवाळी चित्रपट आहे. कुटुंबीयांसोबत तुम्ही हा चित्रपट पाहू शकत आणि त्याचा आनंद घेऊ शकता. यामध्ये ड्रामा, भावना, कॉमेडी आणि भरपूर ॲक्शन आहे. धर्म आणि विज्ञान या दोन गोष्टींच्या मिश्रणामुळे चित्रपटाच्या कथेत उत्सुकता निर्माण होते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही हा चित्रपट कुटुंबीयांसोबत मिळून नक्कीच पाहू शकता.