37 वर्षांपूर्वी ‘रामायण’ मालिकेच्या निर्मात्यांना का चढावी लागली कोर्टाची पायरी? रामानंद सागर यांच्या मुलाकडून खुलासा

| Updated on: Jan 22, 2024 | 9:47 AM

टेलिव्हिजनवर 'रामायण' ही मालिका आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेशी प्रेक्षक भावनिकरित्या जोडले गेले आहेत. मात्र या मालिकेमुळे निर्मात्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. रामानंद सागर यांच्या मुलाने एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता.

37 वर्षांपूर्वी रामायण मालिकेच्या निर्मात्यांना का चढावी लागली कोर्टाची पायरी? रामानंद सागर यांच्या मुलाकडून खुलासा
Ramayan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 22 जानेवारी 2024 | राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज, सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी केवळ अयोध्याच नव्हे, तर सगळा देश सजला आहे. देशभरात रामभक्तीचं वातावरण आहे. अशातच टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘रामायण’ चर्चेत आली आहे. रामानंद सागर यांनी जवळपास 37 वर्षांपूर्वी 1987 मध्ये दूरदर्शनवर ही मालिका सुरू केली होती. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा ही मालिका टीव्हीवर दाखवली गेली, तेव्हा सर्व विक्रम मोडले गेले होते. मात्र ज्यावेळी ही मालिका संपली होती, तेव्हा रामानंद सागर यांना बऱ्याच वादाला सामोरं जावं लागलं होतं.

प्रेक्षकांकडून दररोज हजारो चिठ्ठ्या

गेल्या वर्षी प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी मालिकेच्या वादाबद्दल सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की मालिकेचे एकूण 78 एपिसोड प्रसारित झाले होते आणि त्यानंतर ती मालिका बंद करण्यात आली होती. तेव्हापासून मालिकेच्या चाहत्यांकडून दररोज रामानंद सागर यांना हजारो चिठ्ठ्या यायच्या. मालिकेची कथा पुढे नेण्याबाबत त्यांच्याकडे विनंती केली जायची. मात्र त्यांना मालिकेची कथा पुढे न्यायची नव्हती, कारण पुढे लव-कुशच्या काल्पनिक गोष्टी दाखवल्या लागल्या असत्या.

उत्तरकांडवरून वाद

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर रामानंद सागर यांनी रामायणात उत्तरकांड जोडलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नव्हे तर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. रामानंद सागर यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. या मालिकेवरून वाद झाला असला तरी अनेकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळालं होतं. कोरोना काळात या मालिकेच्या एका एपिसोडला 7.7 कोटी व्ह्यूज मिळाले होते. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली.

हे सुद्धा वाचा

रामायणने प्रत्येक एपिसोडसाठी बराच नफा कमावला होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या मालिकेला 53 विविध देशांमधील तब्बल 650 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिलं आहे. तर इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेनं दूरदर्शनवर पहिल्याच रनमध्ये 23 कोटी रुपये कमावले होते.