मुंबई- रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या ‘रामायण’ (Ramayan) मालिकेचा आजही खूप मोठा चाहतावर्ग आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली, तेव्हा त्यातील कलाकार सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आले. रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) या इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रीय असतात. दीपिका नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे काही नेटकरी त्यांनी ट्रोल करत आहेत.
दीपिका यांनी स्वत:च्या ‘ट्रान्सफॉर्मेशन’चा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काहींना हा व्हिडीओ आवडला आहे तर काहींनी त्यावरून दीपिका यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘हे सर्व तुम्ही केलेलं बरं वाटत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘अशा पोस्टमुळे तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं.
‘चेंज अँड ट्रान्सफॉर्मेशन’ असं कॅप्शन देत दीपिका यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्या हिरव्या रंगाचा ड्रेस आणि हाय हिल्समध्ये पहायला मिळत आहेत. दीपिका यांचा नवा अंदाज पाहून काही युजर्सनी न मागताच त्यांना सल्ला देण्यास सुरुवात केली.
‘तुम्हाला सर्वजण सीता मातेच्या रुपात पाहतात. कृपया अशा पद्धतीचे व्हिडीओ पोस्ट करू नका’, असं एकाने लिहिलं. तर काहींनी दीपिका यांच्या फॅशन सेन्सचं कौतुकसुद्धा केलं. ‘तुम्ही त्यांना देव मानता, ही तुमची चूक आहे. त्यांना आपलं जीवन सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असं म्हणत काही युजर्सनी दीपिका यांची बाजू घेतली.
दीपिका यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीता मातेची भूमिका साकारली होती. 1987 मध्ये दूरदर्शनवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर लॉकडाऊनदरम्यान 2020 मध्ये ही मालिका पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात आली होती.