अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण न मिळाल्याने ‘लक्ष्मण’ नाराज; ‘कदाचित ते मला पसंत..’

| Updated on: Dec 30, 2023 | 8:23 AM

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि व्हिआयपी लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांना बोलावलं नाही.

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण न मिळाल्याने लक्ष्मण नाराज; कदाचित ते मला पसंत..
सुनील लहरी
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 30 डिसेंबर 2023 | अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला भेट देणार आहेत. अयोध्या राम मंदिराच्या भव्य उद्घाटन समारंभासाठी जोरदार तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडपासून छोट्या पडद्यावरील अनेक दिग्ग्ज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेचं देशातील जनतेच्या मनात एक वेगळंच स्थान आहे. या मालिकेतील कलाकारांना आजही प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत पाहिलं जातं. त्यामुळे या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बोलवलंच नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. “तुम्हाला प्रत्येक वेळी बोलवलंच जाईल हे काही गरजेचं नाही. जर मला आमंत्रण मिळालं असतं तर मी नक्कीच तिथे गेलो असतो. मला बोलावलं असतं तर चांगलं वाटलं असतं. या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली असती. पण ठीक आहे. यात वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही.”

हे सुद्धा वाचा

फक्त सुनील लहरीच नाही तर ‘रामायण’ या मालिकेच्या निर्मात्यांनाही बोलवलं गेलं नाही. त्यावर ते पुढे म्हणाले, “कदाचित त्यांना असं वाटतं की लक्ष्मणाची भूमिका तितकी महत्त्वाची नाही किंवा व्यक्तीगतरित्या ते मला पसंत करत नाहीत. मी प्रेम सागर यांच्यासोबत होतो, पण त्यांनासुद्धा बोलावलं गेलं नाही. मला हे ऐकूनच विचित्र वाटलं की त्यांना रामायणाच्या निर्मात्यांना त्यांनी आमंत्रण पाठवलं नाही.”

“कोणाला कार्यक्रमाला आमंत्रित करायचं किंवा कोणाला नाही हा सर्वस्वी कमिटीचा निर्णय आहे. मी असं ऐकलंय की 7 हजार पाहुणे आणि 3 हजार व्हीआयपींना आमंत्रित केलं गेलंय. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या लोकांना आमंत्रित करायला पाहिजे होतं, दे रामायणाशी जोडले गेले आहेत, विशेषकरून मुख्य कलाकार आणि निर्मात्यांना”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.