अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर श्रीरामाच्या भूमिकेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी आणि त्यातील कलाकारांच्या निवडींविषयी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने बरंच काही सांगितलं. यावेळी मुकेशला राम आणि रावण यांच्याविषयी मत मांडायला सांगितलं गेलं. यावर मुकेश रावणाविषयी जे काही म्हणाला, त्यावरून त्याला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातंय. ‘रामायण’ या चित्रपटातील कलाकारांची निवड मुकेशनेच केली आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती.
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये मुकेशला रावणाविषयी त्याचे विचार काय आहेत, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “यार, तेसुद्धा प्रेमातच होते ना? त्यांना सूड घ्यायचा होता पण ते प्रेमातसुद्धा होते. मला जेवढं रामायण समजतं त्यावरून मला असं वाटतं की रावण वाईट तर होते. त्यांना सूड घ्यायचा होता पण ते त्यांच्या बहिणीच्या प्रेमातसुद्धा होते. त्यांच्या बाजूने ते योग्य होते. दोघांमध्ये युद्ध झालं पण दोघं आपापल्या जागी ठीक होते. दोघंही प्रेमात होते.” याविषयी बोलताना त्याने भीतीसुद्धा व्यक्त केली. “आजकाल आपल्या देशात रामायणावरून काहीही बोलायला खूप भीती वाटते’, असं तो म्हणाला.
‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या आणि शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत आहे. मात्र या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. काही दिवसांपूर्वी नेमबाजी शिकतानाचे रणबीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. श्रीरामाच्या भूमिकेसाठी तो नेमबाजीचं प्रशिक्षण घेत असल्याचं म्हटलं जात होतं.
‘रामायण’ हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असल्याचं कळतंय. नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. या फोटोंमध्ये अभिनेता रणबीर हा श्रीरामाच्या तर साई पल्लवी ही सीतेच्या पोशाखात दिसून आली होती.