ज्यांनी सीतेवर संशय घेतला ते.. अयोध्येतील लोकांवर भडकले रामायणातील ‘लक्ष्मण’

| Updated on: Jun 06, 2024 | 11:07 AM

अयोध्येतील जागेबद्दल बोलायचं झाल्यास, तिथे समाजवादी पार्टीचे नेते अवधेश प्रसाद यांनी विजय मिळवला. तर भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला. हा निकाल पाहून प्रचंड निराशा झाल्याची भावना अभिनेते सुनील लहरी यांनी व्यक्त केली.

ज्यांनी सीतेवर संशय घेतला ते.. अयोध्येतील लोकांवर भडकले रामायणातील लक्ष्मण
Sunil Lahri
Image Credit source: Instagram
Follow us on

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी हे लोकसभा निवडणूक निकालावर प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणूक निकालात भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राममंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला. यावर सुनील लहरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अयोध्येतील लोकांनी राम मंदिर बनवणाऱ्या भाजपला मतदान केलं नाही, याचा राग त्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवला. उत्तरप्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव झाला. याठिकाणी समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद जिंकून आले. सुनील यांनी बुधवीर त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित अयोध्येतील लोकांवर संताप व्यक्त केला.

सुनील लहरी यांची पोस्ट-

रामायणाचा संदर्भ देत सुनील लहरी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिलं, ‘आम्ही हे विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी वनवासातून आल्यानंतर सीता मातेवर शंका घेतली होती. जी व्यक्ती देव प्रकट झाल्यावर त्यांना नकार देत असले तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? स्वार्थी! इतिहास साक्षीदार आहे की अयोध्येतील लोकांनी नेहमीच त्यांच्या खऱ्या राजासोबत विश्वासघात केला आहे. धिक्कार आहे!’

आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी पुन्हा एकदा अयोध्येतील लोकांवर निशाणा साधला. ‘अयोध्येतील लोकांनो.. तुमच्या महानतेला मी नमन करतो. तुम्ही तर सीता मातेलाही सोडलं नव्हतं. त्यामुळे रामाला तंबूतून बाहेर काढून भव्य मंदिरात विराजमान करणाऱ्यांची फसवणूक करणं कोणती मोठी गोष्ट आहे? तुम्हाला कोटी कोटी प्रणाम! संपूर्ण भारत तुम्हाला कधी चांगल्या नजरेनं पाहणार नाही’, असं म्हणत त्यांनी हात जोडलेले इमोजी पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा

संतप्त सुनील लहरी यांनी तिसऱ्या पोस्टमध्ये अयोध्येतील लोकांचा ‘बाहुबली’ या चित्रपटातील कटप्पाच्या भूमिकेशी तुलना केली. ‘बाहुबली: द बिगनिंग’ या चित्रपटात कटप्पा त्याचा राजा अमरेंद्र बाहुबलीची हत्या करतो.

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी अयोध्येचा कायापालट कशा पद्धतीने झाला, याची तुफान चर्चा रंगली होती. त्यामुळे अयोध्येत भाजपचा विजय नक्कीच होईल, असा विश्वास अनेकांना होता. मात्र प्रत्यक्षात निकाल पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. सुनील लहरी यांच्यासोबत ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे मात्र मेरठ या मतदारसंघातून निवडून आले. त्यांना सुनील लहरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.