रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त होतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली होती. जिथे राम मंदिर बनवण्यात आलं, त्याच अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता बकरी ईदनिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
सुनील लहरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात दोन व्यक्ती केक कापताना दिसत आहेत. यावरील मजकुरात असं म्हटलंय, ‘इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करा आणि मुक्या प्राण्यांवर दया करा. हे आवाहनसुद्धा मीडियाने अशा पद्धतीने करावं जसं होळीत पाणी वाचवण्यासाठी, दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेशोत्सवात सांकेतिक विसर्जनासाठी केलं जातं. देशात सर्वधर्मसमभाव तर आहेच.’ कृपया यंदा हिंसारहित बकरी ईद साजरी करा आणि पर्यावरणाला वाचवा, असंही त्या फोटोवर लिहिलेलं पहायला मिळतं.
देशभरात आज (17 जून) बकरी ईद साजरी केली जात आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. बकरी ईदच्या दिवशी बकरा कुर्बान करून त्याचं मटण नातेवाईकांमध्ये आणि काही गरीब लोकांमध्ये वाटण्यात येतं. मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते.
सुनील लहरी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा ही मालिका पुन्हा टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात आली, तेव्हा त्यातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आले. तेव्हापासून सुनील लहरी सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी अभिनेते अरुण गोविल यांच्या समर्थनार्थ प्रचारसुद्धा केला होता. अरुण गोविल यांनी मेरठ या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ‘रामायण’ या मालिकेत ते प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत होते.