मुंबई- एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) लवकरच बाबा होणार आहे. राणीच पत्नी मिहिका बजाज (Miheeka Bajaj) गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप या दोघांनी अधिकृतरित्या याबद्दलची कोणती माहिती दिलेली नाही. राणा आणि मिहिकाच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
2020 मध्ये राणाने मिहिकासोबत लग्न केलं. या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय उपस्थित होते. लग्नाआधी हे दोघं एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखायचे. अखेर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि राणा-मिहिकाने लग्नाचा निर्णय घेतला.
राणाने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलिट केले आणि सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याचीही चर्चा होती. मात्र मिहिकाने करवा चौथची पोस्ट शेअर करताच या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
राणा लवकरच ‘राणा नायडू’ या वेब सीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो काका व्यंकटेश डग्गुबत्तीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी एकत्र काम करणार आहे. ‘रे डॉनोवन’ या अमेरिकन क्राइम शोच्या कथेवर आधारित ही सीरिज आहे.
राणाने हाऊसफुल 4, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. त्याचे वडील सुरेश बाबू हे तेलुगू चित्रपट निर्माते आणि वितरक आहेत. तर मिहिका बजाज ही हैदराबादमध्ये ‘ड्यू ड्रॉप’ या डिझाईन स्टुडिओची मालकीण आहे.