मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेता राणा डग्गुबती सध्या त्याच्या आगामी ‘किंग ऑफ कोठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. यादरम्यान त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याला आता माफी मागावी लागली आहे. राणाने अप्रत्यक्षरित्या अभिनेत्री सोनम कपूरवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. अखेर त्यावरून वाढता वाद पाहता राणाने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. या ट्विटमध्ये त्याने सोनम कपूर आणि अभिनेता दुलकर सलमानचीही माफी मागितली आहे.
राणाने त्याच्या आगामी ‘किंग ऑफ कोठा’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दुलकर सलमानची स्तुती केली. “दुलकर सलमान खूपच शांत स्वभावाचा आहे. तो एका हिंदी चित्रपटासाठी माझ्या घराजवळ शूटिंग करत होता. तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तो एका कोपऱ्यात उभा होता. त्याच सेटवर एका स्पॉटबॉयसोबत एक मोठी हिंदी चित्रपटातील अभिनेत्री तिच्या पतीसोबत फोनवर लंडनमधील शॉपिंगबद्दल बोलत होती. तिचं कामात लक्ष नसल्याने काही सीन्स योग्यरित्या शूट झाले नव्हते. त्यामुळे सेटवरील लोक त्रस्त झाले होते. इतकं सगळं होऊनही दुलकर सलमानने उत्तम कामगिरी केली आणि तो पूर्णवेळ शांत राहिला”, असा किस्सा त्याने सांगितला.
I am genuinely troubled by the negativity that has been aimed at Sonam due to my comments, that are totally untrue and were meant entirely in a light-hearted manner. As friends, we often exchange playful banter, and I deeply regret that my words have been misinterpreted.
I take…— Rana Daggubati (@RanaDaggubati) August 15, 2023
हा संपूर्ण किस्सा सांगताना राणाने कुठेच सोनमचं नाव घेतलं नव्हतं. मात्र नेटकऱ्यांनी त्याच्या वक्तव्याचं कनेक्शन सोनम कपूरशी जोडलं. अखेर राणाने आता ट्विट करत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे अभिनेत्री सोनम कपूरला नकारात्मकतेचा सामना करावा लागतोय. मी खरंच हैराण झालो आहे. कारण हे पूर्णपणे खोटं आहे. मी फारच हलक्या मनाने ते वक्तव्य केलं होतं. मित्र या नात्याने आम्ही अनेकदा एकमेकांची हलकीफुलकी मस्करी करतो. पण माझ्या शब्दांचा अर्थ चुकीचा लावल्याने मला वाईट वाटतंय. मी सोनम आणि दुलकर सलमान यांची मनापासून माफी मागतो. कारण त्या दोघांविषयी माझ्या मनात खूप आदर आहे. मला आशा आहे की या स्पष्टीकरणामुळे सर्व गैरसमजुतींना पूर्णविराम मिळेल’, असं त्याने या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.