मुंबई : 13 डिसेंबर 2023 | बापलेकाच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना ‘ॲनिमल’ या चित्रपटात पहायला मिळतेय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांनी पितापुत्राची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत रणबीरने सांगितलं होतं की शूटिंगदरम्यान त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण यायची. आता रणबीर आणि त्याचे वडील ऋषी कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खऱ्या आयुष्यातही रणबीरचं त्याच्या वडिलांसोबत ‘ॲनिमल’ चित्रपटात दाखवल्यासारखंच नातं होतं, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.
एका मुलाखतीत रणबीरने ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी शूटिंग करतानाचा अनुभव सांगितला. “मी जेव्हा कधी दिग्दर्शिक संदीप यांना भेटायचो, तेव्हा त्यांच्याकडे माझ्या भूमिकेसाठी संदर्भ मागायचो. मी कधीच अशा प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घेतला नाही. शूटिंग करताना मला माझ्या वडिलांची अनेकदा आठवण आली. मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने बोलायचे, ते फार भावूक आणि रागीट व्यक्ती होते. म्हणूनच मी माझी भूमिका माझ्या वडिलांप्रमाणे साकारण्याचा प्रयत्न केला”, असं तो म्हणाला होता.
आता सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये रणबीर एका कार्यक्रमात मीडियासमोर बोलताना दिसत आहे. त्याचवेळी त्याचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर तिथे येतात आणि रणबीर त्यांची गळाभेट घेतो. त्यानंतर ऋषी कपूर म्हणतात, “सर्वांत आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही एकाच घरात राहत नाही. वेगवेगळे राहतो. त्यामुळे हा फक्त योगायोग आहे की आम्ही एकाच वेळी इथे आलो आणि तुमच्यासमोर हजर झालो.”
ऋषी कपूर यांच्याकडून असं ऐकल्यानंतर काही पत्रकार त्यांना विचारतात, “असं का?” त्याचं उत्तर देताना ऋषी कपूर पुढे बोलू लागतात, “असं यासाठी कारण..” मात्र तितक्यातच रणबीर त्यांना थांबवतो आणि म्हणतो, “काहीच समस्या नाहीये.” यापुढे तो वडिलांचं कौतुक करत म्हणतो, “यांच्यापेक्षा सुंदर व्यक्ती या जगात बनलीच नाही.” असं म्हणून तो तिथून निघून जातो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘प्रत्येक जण सलमान खान असू शकत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘पालकांसोबत राहणारा स्टार म्हणजे सलमानच’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘म्हणूनच रणबीरने चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे, कारण खऱ्या आयुष्यातही त्याने तेच पाहिलंय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.