संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. मात्र ठराविक प्रेक्षकवर्ग आणि कलाकारांकडून त्यावर टीकासुद्धा झाली होती. या टीकेवर आता चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरने नुकतीच निखिल कामतच्या ‘WTH’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने असाही खुलासा केला की भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक सदस्यांनी त्याच्याकडे नाराजी व्यक्त होती. चित्रपटातील हिंसाचार आणि पुरुषत्वाचा अतिरेक पाहून काहींनी या चित्रपटावर टीका केली होती.
या मुलाखतीत निखिल कामतने असं मत व्यक्त केलं की, प्रेक्षकांनी चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी पहावा, ते समाज नैतिकतेची भावना प्राप्त करण्याचं साधन समजू नये. त्यावर रणबीरनेही होकार देत म्हटलं, “ॲनिमल या चित्रपटामागे माझा हाच हेतू होता, परंतु त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.”
याविषयी रणबीर पुढे म्हणाला, “सोशल मीडियाने कहर केला. त्यांना सतत काहीतरी बोलण्यासाठी विषय हवा असतो. म्हणून त्यांनी असा दावा केला की हा स्त्रीविरोधी चित्रपट आहे. यामुळे तुम्ही जी मेहनत घेता, ती वाया जाते. याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ‘कबीर सिंग’ बनवला होता आणि त्यावरही अशीच टीका झाली होती. पण यामुळे मेहनत पाण्यात जाते. चित्रपटाला एक टॅग मिळतो, जे खरं नसतं. त्या चित्रपटासोबत हा टॅग आणि ठराविक लोकांचा दृष्टीकोन कायम राहतो. सर्वसाधारण लोक या चित्रपटाबद्दल चांगलंच बोलत होते. पण असेही काही लोक होते, जे मला भेटून म्हणायचे की तू असा चित्रपट करायला पाहिजे नव्हता. तू आमची खूप निराशा केलीस. फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी मला हेच सांगितलं. मी त्यांची शांतपणे माफी मागतो आणि म्हणतो, माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही. मी त्यांच्याशी सहमत नाही. पण मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला लोकांशी वाद घालायचा नाही. जर तुम्हाला माझं काम आवडत नसेल तर तर मी तुमची माफी मागतो आणि त्यापुढे आणखी मेहनत करण्याचा प्रयत्न करतो.”
ऑनस्क्रीन सतत ठराविक भूमिका साकारल्याने ‘गुड बॉय’ची प्रतिमा निर्माण झाली होती आणि तीच प्रतिमा मोडीत काढण्यासाठी हा चित्रपट केल्याची कबुली रणबीरने या मुलाखतीत दिली. “मी माझ्या करिअरमध्ये फक्त चांगल्या भूमिका करत होतो. त्यामुळे मला हा चित्रपट फार बोल्ड आणि अडल्ट रेटेड वाटला. प्रेक्षक मला स्वीकारणार नाहीत, अशीही भीती माझ्या मनात होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, कमाईसुद्धा चांगली झाली. पण एक वर्ग असाही होता, ज्यांना हा चित्रपट चुकीचा किंवा स्त्रीविरोधा वाटला. पण मी माझ्या करिअरमध्ये चांगल्या भूमिका साकारून कंटाळलो होतो”, असं तो पुढे म्हणाला.