नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरील काही फोटोसुद्धा लीक झाले आहेत. अशातच ‘रामायण’ने प्रदर्शनापूर्वीच नवा विक्रम रचल्याचं समजतंय. हा भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ठरला असून त्याचा बजेट 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची चर्चा जागतिक स्तरावर व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. रणबीर आणि साईचा हा चित्रपट तब्बल 835 कोटी रुपयांमध्ये बनणार आहे. हा बजेट फक्त रामायणच्या पहिल्या भागाचा आहे. त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागासाठी याहून अधिक खर्च केला जाणार आहे.
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट 1’चा बजेट 450 कोटी रुपये इतका होता. याशिवाय ‘कल्की 2898 एडी’, ‘आदिपुरुष’, ‘2.0’ आणि ‘RRR’ या चित्रपटांचाही बजेट 500 ते 600 कोटी रुपयांदरम्यान आहे. दुसरीकडे रणबीरच्या ‘रामायण’ या चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाचे हक्क सध्या निर्माते मधू मंटेना यांच्याकडे आहेत. प्राइम फोकसकडे अद्याप चित्रपटाचे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स नाहीत. त्यामुळे आता ते चित्रपटाची कथा आणि नावाचा वापर करू शकत नाहीत. यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. मधू मंटेनाने नमित मल्होत्राला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. माझ्याकडे अधिकार असताना जर कथेचा वापर केला तर ते कॉपीराइट्सचं उल्लंघन ठरेल.
‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र नंतर आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाली. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे.