मुंबई : 2 डिसेंबर 2023 | रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. आता थिएटरमध्ये ‘ॲनिमल’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरून विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. काहींनी चित्रपटातील सीन्स फेसबुक, ट्विटरवर लीक केले आहेत. रणबीर कपूर, बॉबी देओल यांचे ॲक्शन सीन्स तर चर्चेत आहेतच, पण या सर्वांत रणबीर आणि रश्मिकाच्या इंटिमेट सीन्सने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रश्मिकासोबतचे रणबीरचे काही बेडरुम सीन्स व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर सध्या ‘ॲनिमल’च ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये रणबीरने एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे. गँगस्टरच्या भूमिकेतील त्याच्या नव्या लूकने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर आता रश्मिका आणि रणबीरचे इंटिमेट सीन्स व्हायरल होत आहे. चित्रपटातील ‘हुआ मैं’ या गाण्यातील दोन फोटो एका युजरने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर-रश्मिकाचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
सेन्सॉर बोर्डने ‘ॲनिमल’ला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं आहे. त्याचसोबत चित्रपटातील पाच सीन्सवर सेन्सॉरने कात्री चालवली आहे. यात रणबीर-रश्मिकाच्याच इंटिमेट सीन्सचा समावेश होता. मोठ्या पडद्यावर ही नवीकोरी जोडी पहिल्यांदाच झळकली आहे. या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडतेय. या चित्रपटात रणबीर आणि रश्मिकासोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
रणबीरने या चित्रपटात अर्जुन नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे. जो अत्यंत निर्दयी आणि तितकाच महत्त्वाकांक्षी आहे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. या चित्रपटाच्या कथेत वडील आणि मुलाच्या नात्याला विशेष अधोरेखित केलं आहे. संघटित गुन्हेगारीचं वेगळंच विश्व या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. विश्वासघात आणि सत्तासंघर्ष हे या गुन्हेगारी विश्वात सतत पहायला मिळतं. अर्जुन हा याच अंडरवर्ल्डमधील एक उगवता तारा आहे.
‘ॲनिमल’ने पहिल्याच दिवशी देशभरात 61 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात 110 ते 115 कोटी रुपयांची कमाई केली आहे.