मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांमधील केमिस्ट्री सोशल मीडियावर हिट ठरतेय. रणबीरला नुकतंच ‘हॉसेर पेन्स’ या स्टेशनरी ब्रँडसाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आलं आहे. हा मूळ जर्मन ब्रँड आहे. यानिमित्त हॉसेर पेन्सच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर त्याच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. शाळेत असताना मुख्याध्यापकांनी एकदा कानाखाली मारल्याचं त्याने सांगितलं.
रणबीर म्हणाला, “माझ्या मते मी खूप चांगल्या प्रकारे कॉपी करतो, म्हणूनच मी कधी पकडलो गेलो नाही. पण मी सातवीत किंवा आठवीत असताना घडलेली एक घटना मला चांगलीच आठवतेय. मी क्लासच्या बाहेर रांगत जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि तितक्यात मुख्याध्यापक समोर आले. त्यांनी मला क्लासच्या बाहेर जाताना पाहून माझ्या कानशिलात लगावली. मला अजूनही ती घटना खूप स्पष्टपणे आठवतेय. मुख्याध्यापकांनी माझ्या कानाखाली काढलेला आवाज मला आजसुद्धा ऐकू येतो.”
या व्हिडीओमध्ये रणबीर त्याच्या फुटबॉल प्रेमाविषयीही व्यक्त झाला. “मी सहावीत असताना माझी फुटबॉल टीमसाठी निवड झाली होती. फुटबॉल स्पर्धेत मी गोल केला होता. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या मागच्या पानावर सर्व आंतरशालेय स्कोअरर्सची नावं छापली जायची. त्यावेळी पहिल्यांदा माझं नाव वृत्तपत्रात आलं होतं. माझ्या आईने वृत्तपत्रातील ती बातमी कापून ठेवलं होतं. तिने ते कात्रण आजही जपून ठेवलं आहे. माझ्या आयुष्यातील ती सर्वांत मोठी गोष्ट होती”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटासोबत रणबीरच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.