मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता रणबीर कपूरला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) समन्स बजावले होते. रणबीरला 6 ऑक्टोबर रोजी ईडीच्या रायपूर इथल्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास ईडीने सांगितलं होतं. त्यावर आता रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. 4 ऑक्टोबर रोजी त्याला हे समन्स बजावण्यात आले होते. आता चौकशीच्या ठीक एक दिवस आधी रणबीरने ईडीकडून वेळ मागितली आहे. याप्रकरणात साक्षीदार म्हणून रणबीरचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचं कळतंय. त्याने सोशल मीडियावर या ॲपसाठी जाहिरात केल्याची माहिती ईडीच्या तपासात उघड झाली होती.
रणबीर कपूरसह सुमारे 12 हून अधिक कलाकार, खेळाडूंनी महादेव ॲपसाठी सोशल मीडियावर जाहिरात केली होती. मात्र या जाहिरातीसाठी सर्वाधिक रक्कम रणबीरला मिळाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने सप्टेंबर महिन्यात मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात भोपाळ, कोलकाता आणि मुंबई इथल्या 39 ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी जवळपास 417 कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात किंवा जप्त करण्यात आली होती.
सौरभ चंद्राकर आणि भागीदार रवी उप्पल हे दोघं बुक बेटिंग ॲपचे प्रवर्तक आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये सौरभचं दुबईमध्ये लग्न झालं. या लग्नसोहळ्यासाठी तब्बल 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. लग्नासाठी कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून दुबईला नेण्यासाठी खासगी विमान भाड्याने घेण्यात आले होते. या लग्नात परफॉर्म करण्यासाठी बॉलिवूड कलाकार आणि गायकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरुचा, क्रिती खरबंदा, एली अवराम यांनी या लग्नसोहळ्यात परफॉर्म केलं होतं. या सर्व सेलिब्रिटींचे व्यवहार हवाला मार्फत झाल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं होतं.