मुंबई : 16 फेब्रुवारी 2024 | अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर आहे. या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्याला नुकताच एक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना रणबीरने त्याच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या नियमांबद्दल व्यक्त झाला. यावेळी त्याने देशातील सर्वांत मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचाही उल्लेख केला. अंबानी यांनी दिलेला सल्ला आयुष्यभर लक्षात ठेवत असल्याचं त्याने सांगितलं. रणबीरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका होत्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांचे आभार मानत रणबीर म्हणाला, “मला मुकेश अंबानी यांनी एकदा सांगितलं होतं की यश किंवा अपयश या गोष्टींचा स्वत:वर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्यामुळे माझं पहिलं लक्ष्य हेच आहे की चांगलं काम करत राहणं. मी माझ्या आयुष्यात मुकेश भाईंकडून बरेच सल्ले घेतले आहेत. त्यांनी मला सांगितलं की आपण आपली मान खाली करावी आणि काम करत राहावं. यशाला डोक्यावर आणि अपयशाला मनावर कधीच घेऊ नये. आयुष्यातील माझं दुसरं लक्ष्य म्हणजे चांगली व्यक्ती बनणं. मला एक चांगला मुलगा, चांगले वडील, चांगला पती, चांगला भाऊ आणि मित्र बनायचं आहे. यासोबतच मला चांगला नागरिक व्हायचं आहे. मला मुंबईकर असल्याचा गर्व आहे आणि हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते रणबीरला हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी पुरस्कार देताना जितेंद्र यांना रणबीरचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आठवण आली. ते म्हणाले, “तुम्ही हा पुरस्कार रणबीरला देत आहात, जो माझ्या सर्वांत जवळच्या मित्राचा मुलगा आहे. मी कालपासून तयारी करत होतो की मला काय बोलायचं आहे? माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा मला मार्गदर्शन करत होते. मला खूप आनंद आहे की माझ्या सर्वांत खास मित्राच्या मुलाला हा पुरस्कार मिळाला आहे. आज तो ज्या ठिकाणी पोहोचला आहे, ही त्याची मेहनत आहे.”