‘ॲनिमल’नंतर अभिनेता रणबीर कपूरने आणखी एक आव्हानात्मक प्रोजेक्ट हाती घेतला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी कमालिची गुप्तता पाळण्यात येत असली तरी आता सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये पुरातन काळाचं प्रदर्शन करण्यासाठी वास्तुचं बांधकाम केलं जात असल्याचं पहायला मिळतंय. एका इन्स्टाग्राम युजरने ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील दोन फोटो पोस्ट केले आहेत. चित्रपटाच्या ‘क्रू’ मेंबरशी तिचा काही संबंध असावा, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.
पहिल्या फोटोमध्ये लाकडी भिंती आणि खांब यांचं बांधकाम सुरू असल्याचं दिसतंय. यात एखाद्या मंदिरासारखी घुमट रचनाही पहायला मिळतेय. ‘रामायणचा पहिला दिवस’, असं कॅप्शन संबंधित युजरने फोटोंना दिला आहे. आणखी एका नेटकऱ्याने एक्सवर (ट्विटर) चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ पोस्ट केला आहे. फेब्रुवारी महिन्यात रणबीर हा श्रीराम यांच्या भूमिकेसाठी खास आवाज आणि शब्दोच्चारांचं प्रशिक्षण घेत असल्याचं समोर आलं होतं. मार्चमध्ये तो तिरंदाजीचं प्रशिक्षण घेत असल्याचाही फोटो व्हायरल झाला होता.
Ramayana set 😻💥#RanbirKapoor #niteshtiwari pic.twitter.com/SuUzwwjyUX
— Ranbir Kapoor 👑❤️ (@Khushali_rk) April 3, 2024
‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. या भूमिकेसाठी तो फारच उत्सुक आहे.
Shooting for #NiteshTiwari‘s #Ramayana begins. #ranbirkapoor in Mumbai! pic.twitter.com/l5JR93llTd
— Filmi Files (@Filmifiles) April 3, 2024
यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.