मुंबई : 8 जानेवारी 2024 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली. यामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, बॉबी देओल, अनिल कपूर यांसह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. 2023 या वर्षात दमदार कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘ॲनिमल’चा सहभाग होतो. या चित्रपटातील कलाकारांना रातोरात यश मिळालं. तृप्ती डिमरी आता ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाऊ लागली. चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड यशानंतर शनिवारी मुंबईत ‘ॲनिमल’च्या टीमकडून जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला चित्रपटातील कलाकार आणि इंडस्ट्रीतील इतरही सेलिब्रिटी उपस्थित होते. ‘ॲनिमल’च्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील रणबीर कपूरच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी रणबीरला चांगलंच ट्रोल करत आहेत. रश्मिका जेव्हा मंचावर असते, तेव्हा रणबीर पुढे येऊन तिची भेट घेतो. या भेटीदरम्यान तो रश्मिकाच्या गालावर किस करतो. त्यानंतर बॉबी देओल आणि अनिल कपूर पुढे येऊन तिची भेट घेतात. रश्मिकाने पार्टीमध्ये एण्ट्री करताच तिथे उपस्थित असलेल्या रणबीरने आधी तिच्या जवळ जाऊन भेट घेतली. रश्मिका आणि रणबीरच्या या किसिंग व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा या पार्टीला उपस्थित होती.
‘आलिया सर्वकाही बघतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘आलियाच्या समोरच दुसऱ्या मुलीला किस करतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. रश्मिका ही 27 वर्षांची आहे तर रणबीर 41 वर्षांचा आहे. या दोघांच्या वयातील 14 वर्षांच्या अंतरावरूनही नेटकरी कमेंट करत आहेत. रश्मिकाने ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीरच्या प्रेयसी आणि पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील दोघांचे बोल्ड सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
‘ॲनिमल’ या चित्रपटाने जगभरात 900 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. मात्र या चित्रपटातील सीन्स, डायलॉग्सवर काही प्रेक्षकांनी आक्षेपसुद्धा घेतला आहे. चित्रपटात बरेच हिंसक आणि स्त्रीविरोधी सीन्स असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली. यावर या पार्टीत रणबीरने मौन सोडलं. “ॲनिमल या चित्रपटाबद्दल काही जणांना समस्या होती पण माझ्या मते जे प्रेम, यश आणि बॉक्स ऑफिसचे आकडे या चित्रपटाला मिळाले आहेत, त्यावरून हे सिद्ध होतंय की चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमापेक्षा अधिक महत्त्वाचं काहीच नाही. चित्रपटापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही”, असं तो म्हणाला.