अभिनेता रणदीप हुडाचा ‘सरबजीत’ हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. सरबजीत सिंग यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. ऐश्वर्याला तिच्या भूमिकेसाठी बरेच पुरस्कारदेखील मिळाले होते. मात्र प्रशंसेचा मोठा वाटा ऐश्वर्याला मिळाल्याचं वाईट वाटलं, अशी कबुली अभिनेता रणदीपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. त्याचसोबत एखाद्या कलाकाराने पुरस्कारांना एवढं महत्त्व देऊ नये, असंही त्याने म्हटलंय.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रणदीपला विचारण्यात आलं की ‘सरबजीत’मधील भूमिकेसाठी तुला पुरेसं श्रेय मिळालं नाही असं वाटतं का? त्यावर उत्तर देताना रणदीप म्हणाला, “सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, एक कलाकार म्हणून तुम्ही जर तुमचं मूल्यमापन पुरस्कारांच्या संख्येवरून करणार असाल, तर ते तुमच्या विकासासाठी चांगलं नाही. इंडस्ट्रीतून तुमच्या कामाचं कौतुक झालं तर ते प्रेरणादायी ठरू शकतं. पण मी इतकंच म्हणू शकतो की ऐश्वर्याला जे काही मिळालं, त्यात मी खुश आहे. मला जरी मिळालं नसलं तरी मी आनंदी आहे. त्याबाबत आता तक्रार करणं अयोग्य ठरेल. जर लोकांनीच ही गोष्ट उचलून धरली, तर त्यातच माझा विजय आहे.”
“मी अशा पद्धतीच्या चर्चेत कधीच सहभागी होत नाही. कारण कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशातली ती गोष्ट ठरेल. मला वाईट वाटलं का? तर अर्थात वाटलं होतं. पण त्याचा अर्थ असा नाही जग तिथेच संपलं. तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे पुढे निघून जाता. एक अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून माझ्या प्रतिमेवर नियंत्रण मिळवण्याचा हक्क मी इतरांना देत नाही”, असं त्याने पुढे स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रणदीप ‘सरबजीत’मधल्या ऐश्वर्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. तो म्हणाला, “तिने खूप चांगलं काम केलं. ती तिच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होती. सेटवर जरी आम्ही एकमेकांशी फार बोलू शकलो नसलो तरी जे सीन्स एकत्र होते, त्यात तिने चांगलं काम केलं. ऐश्वर्या खऱ्या आयुष्यात जितकी ग्लॅमरस आहे, त्यापेक्षा फार कमी स्क्रीनवर दिसावी यासाठी दिग्दर्शकांनी प्रयत्न केले. मात्र तो प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही.”