बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर – अभिनेत्री करीना कपूर यांचे वडील आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांनी मोठ्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. मुलींनी बॉलिवूडमध्ये यावं अशी रणधीर कपूर यांची इच्छा कधीच नव्हती. दोन्ही मुलांच्या यशाचं श्रेय रणधीर कपूर यांनी मुलींची आई आणि पत्नी बबिता कपूर यांना दिलं आहे. शिवाय रणधीर कपूर यांनी मुलींवर गर्व असून त्यांच्या मेहनतीचं कौतुक देखील केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी भावना व्यक्त केल्या.
रणधीर कपूर म्हणाले, ‘मला माझ्या मुलींवर गर्व आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. यासाठी त्यांची आईच त्यांच्यासाठी प्रेरणा होती. मी दोन्ही मुलींच्या यशाचं श्रेय त्यांच्या आईला देतो. पत्नीनेच दोघींना मार्ग दाखवला. मी कधीच माझ्या मुलींना पाठिंबा दिला नाही.’
‘जेव्हा दोघी लहान होत्या तेव्हा मी विचार देखील केला नव्हता की, मोठ्या होवून दोघी यशाचं उच्च शिखर गाठतील. माझ्या वडिलांनी (राज कपूर) जे मला सांगितलं तेच मी दोघींना सांगितलं. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. जर आम्ही करत असलेला व्यवसाय वाईट असता तर, आम्ही स्वतःयात नसतो. आम्ही काम करतोय, तर तुम्हाला नकार देऊ शकत नाही.’
‘तुम्ही काम करा पण त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ व्हा… माझ्या दोन्ही मुलींनी कोणाचं समर्थन नसताना यशाचं शिखर गाठलं, याचा मला गर्व आहे. त्यांनी खूप मेहनत केली आहे.’ असं म्हणत रणधीर कपूर मी चांगला वडील नाही… असं देखील म्हणाले…
‘अशा प्रकारे मी एक वाईट वडील आहे. तरी देखील मी आजही थोडा वेंधळा आहे. सर्वांना माहिती आहे की, मी थोडा वेंधळा आहे. मला फार मेहनत करायची नाही. मला जास्त सिनेमांमध्ये देखील काम करायचं नाही. मला आजही ऑफर येतात. पण मी त्यांना नकार देतो.’
‘मी माझ्या आयुष्यात कमावून ठेवलं आहे. आता माझी मुलं माझ्यापेक्षा जास्त कमावतात. त्यासाठी मी संतुष्ट आहे. आमच्याकडे अन्न-कपडे आणि घर… आमच्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे मला आता काहीही नको. या वयात मला दिवस – रात्र धावपळ करुन काम करायचं नाही…’ असं देखील रणधीर कपूर म्हणाले.