मुंबई : 18 ऑक्टोबर 2023 | आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडणारा अभिनेता कुणाल कपूर सध्या इंडस्ट्रीपासून दूरच आहे. कुणालचा जन्म 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबईत झाला. ‘रंग दे बसंती’नंतर त्याने ‘लागा चुनरी में दाग’, ‘डिअर जिंदगी’ आणि ‘आजा नचले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून तो चित्रपटांमध्ये झळकला नाही. फार क्वचित लोकांना माहीत असेल की कुणाल हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जावई आहे. बिग बींची भाची नैना बच्चनशी त्याने लग्न केलंय. गेल्या वर्षी नैनाने मुलाला जन्म दिला.
कुणालने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत करिअरची सुरुवात केली. अमिताभ बच्चन आणि मनोज बाजपेयी यांच्या ‘अक्स’ या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 2004 मध्ये त्याने पहिल्यांदा अभिनयविश्वात पाऊल ठेवलं. ‘मिनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासोबत तब्बूने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर आमिरचा ‘रंग दे बसंती’ हा त्याचा दुसरा चित्रपट ठरला. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली.
कुणालच्या ‘लागा चुनरी में दाग’, ‘आजा नचले’ आणि ‘बचना ए हसीनों’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर त्याने 2010 मध्ये पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. राहुल ढोलकियाच्या ‘लम्हा’मध्ये संजय दत्त आणि बिपाशा बासू यांच्यासोबत त्याने भूमिका साकारली होती. याशिवाय ‘डॉन 2’, ‘लव्ह शव्ह ते चिकन खुराना’ आणि ‘कौन कितने पानी में’ या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं. मात्र त्यांची विशेष काही चर्चा झाली नाही.
अमिताभ बच्चन यांची भाची नैना बच्चन ही माजी इन्वेस्टमेंट बँकरसुद्धा आहे. बिग बींचे छोटा भाऊ अजिताभ आणि त्यांची पत्नी रमोला बच्चन यांची ती मुलगी आहे. 2010 मध्ये कुणाल आणि नैनाची पहिली भेट झाली होती. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2015 मध्ये या दोघांनी लग्न केलं. सेशेल्स याठिकाणी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत कुणाल आणि नैनाने लग्नगाठ बांधली.