अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर होणारी दमदार कमाई, दुसरीकडे संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेला महिलेचा मृत्यू आणि तिसरीकडे निर्मात्यांकडून मल्टिप्लेक्ससोबत केला जाणारा करार.. या सर्व कारणांमुळे सध्या ‘पुष्पा 2’ हा चित्रपट प्रकाशझोतात आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही मल्टिप्लेक्ससोबत करार केला. या करारानुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिले दहा दिवस त्यांना दुसऱ्या कोणत्याही चित्रपटांचे शोज थिएटरमध्ये लावता येणार नाहीत. एका प्रसिद्ध मल्टिप्लेक्स साखळीशी संबंधित व्यक्तीने जेव्हा ‘झूम’ वाहिनीला यासंदर्भात मुलाखत देऊन धक्कादायक खुलासा केला, तेव्हा त्यावरून बरीच टीका झाली. पहिल्या दहा दिवसांत जर दुसऱ्या चित्रपटांचे शोज लावले तर थिएटरला दंड ठोठवावा लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं. यावरून निर्माते विक्रमादित्य मोटवाने यांनी इतर चित्रपटांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांना फटकारलं होतं. आता या मुद्द्यावर ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
‘गलाटा प्लस राऊंड टेबल 2024’ दरम्यान या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कन्नड अभिनेत्री चांदनी साशा म्हणाली, “माझ्या मते ज्याप्रकारे ते चित्रपटाचं मार्केटिंग करत आहेत, त्याकडे बघणं फार महत्त्वाचं आहे. पुष्पा थेट बिहारमध्ये गेला आणि तिथे मोठा कार्यक्रम करण्यात आला. प्रसिद्धीसाठी त्यांनी खूप पैसा खर्च केलाय. वितकरांसोबतही त्यांनी करार केलाय. देशातील प्रत्येक स्क्रीनवर फक्त पुष्पाच दाखवला जातोय. आता आपण स्वत:ला हा प्रश्न विचारायाची वेळ आली आहे की, यामुळे खरंच हा पॅन-इंडिया चित्रपट ठरतो का? मला चुकीचं समजू नका, पण बारोज हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॅन इंडिया आणि पॅन वर्ल्ड आहे. हे एका वेगळ्या पातळीवरचं भारतीय सिनेमाचं सेलिब्रेशन आहे. कारण त्यात पोर्तुगाल, आफ्रिका, भारत अशा अनेक ठिकाणचे कलाकार आणि तंत्रज्ञ आहेत.”
या मुद्द्यावर अभिनेता सिद्धार्थनेही त्याचं मत मांडलं. “प्रत्येकजण मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातो आणि तेलुगूमध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांनाच आमचा देव मानतो. आता काही लोक देवाच्या अवघ्या पाच सेकंदांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात, तर काही जण व्हिआयपी तिकिटाद्वारे बराच वेळ देवाचं दर्शन घेऊ शकतात. आता कोणाची प्रार्थना अधिक महत्त्वाची आहे आणि कोणती प्रार्थना चांगली आहे? निर्मात्यांचे प्रयत्नसुद्धा असेच आहेत. माझ्याकडे व्हिआयपी तिकिट नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी देवाचं दर्शन घेऊ शकत नाही. त्याचप्रकारे, जर सर्व थिएटर्समध्ये एकच चित्रपट दाखवला जात असेल तर त्याचा अर्थ ज्याच्याकडे पॉवर आहे, ते त्याच्या वापराने काहीही करू शकतात. मग इथे असा प्रश्न उपस्थित राहतो की, सिस्टीम सर्वांसाठी समान आहे का? शेवटी पैसे बोलतात”, असं परखड मत सिद्धार्थने मांडलंय.