मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. बॉलिवूडमध्ये घटस्फोट होणं काही नवीन गोष्ट नाही, पण दीपिका आणि रणवीर यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडचं परफेक्ट कपल म्हणून दोघांची ओळख आहे. शिवाय दीपिका – रणवीर यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. अनेक ठिकाणी दोघांमध्ये असलेलं प्रेम चाहत्यांनी पाहिलं. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण आता दोघांच्या वैवाहित आयुष्यात संकट आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
जेव्हा रणवीर याला ३८ व्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छा देत होते, तेव्हा पतीच्या वाढदिवसानिमित्त दीपिकाने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नव्हती. दीपिकाने रणवीर याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छ न दिल्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असावं अशी चर्चा रंगली.
दरम्यान, रणवीर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याने पत्नी दीपिका पादुकोण हिच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी असल्याचं चित्र दिसून येत आहे. फोटोमध्ये दीपिका डोळे बंद करत हसत आहे, तर रणवीर कॅमेऱ्याकडे पाहत आहे.
फोटो शेअर करत अभिनेत्याने पत्नीचे आभार मानले आहेत. ‘वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्यामुळे आभार…’ असं अभिनेता फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हणाला आहे. सध्या सर्वत्र दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.
जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि रणवीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर आणि दीपिका यांनी लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत मोठ्या शाही अंदाजात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आजही दोघांच्या लग्नाची तुफान चर्चा रंगत असते.
रणवीर याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेच. सिनेमात रणवीर अभिनेत्रा आलिया भट्ट हिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा प्रेमकथेवर आधारित आहे.
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक करण जोहर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सिनेमात आलिया – रणवीर यांच्यासोबत अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना अझमी झळकणार आहेत.