अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची मुलगी दुआ नुकतीच तीन महिन्यांची झाली. 8 डिसेंबर रोजी तिच्या तीन महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त रणवीरची आई आणि दीपिकाची सासू अंजू भवनानी यांनी अत्यंत खास गोष्ट दान केली आहे. अंजू यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरूनच याचा खुलासा झाला. नातीच्या तीन महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त अंजू यांनी त्यांचे केस दान केले आहेत. याचाच फोटो त्यांनी स्टोरीमध्ये पोस्ट करत ‘दान केले’ असं त्यावर लिहिलंय. आणखी एका फोटोसोबत त्यांनी लिहिलं, ‘माझी डार्लिंग दुआ हिला तीन महिन्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेम आणि आशेच्या या कृतीने मी हा दिवस आणखी खास बनवत आहे. दुआ मोठी होत असल्याचा आनंद साजरा करत असतानाच दयाळूपणा आणि चांगुलपणाच्या सामर्थ्याची आठवण ठेवत ही छोटीशी कृती करतेय. यामुळे कठीण काळातून जात असलेल्या व्यक्तीला थोडा तरी दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशी आशा आहे.’
अंजू यांच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. दीपिका नुकतीच बेंगळुरूला गेली होती. पंजाबी गायक दिलजित दोसांझच्या कॉन्सर्टला तिने हजेरी लावली होती. बाळंतपणानंतर ती पहिल्यांदाच अशा प्रकारे चाहत्यांसमोर आली होती. या कॉन्सर्टमध्ये तिने स्टेजवर डान्ससुद्धा केला. मुंबईत परतल्यानंतर एअरपोर्टवरील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती मुलगी दुआला उचलून कारच्या दिशेने चालत जाताना दिसली. यावेळी तिने माध्यमांपासून दुआचा चेहरा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
याआधी बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या बाळाचा चेहरा माध्यमांसमोर किंवा फोटोग्राफर्ससमोर आणला नव्हता. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनेही त्यांची मुलगी राहाचा चेहरा सुरुवातीला पापाराझींना दाखवला नव्हता. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अजूनसुद्धा त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. त्यांनी फोटोग्राफर्सनाही त्यांचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली आहे.