ग्रॅमी पुरस्कार विजेती रॅपर कार्डी बी (Cardi B) हिला गुरुवारी न्यूयॉर्क सिटी स्ट्रिप क्लबमध्ये (NYC club brawl) झालेल्या भांडणासाठी दोषी ठरविण्यात आलं आहे. शिक्षा म्हणून कार्डीला 15 दिवस कम्युनिटी सेवा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. 29 वर्षीय कार्डीने कम्युनिटी सेवा करण्याची अट मान्य केली आहे. कारण या प्रकरणाचा खटला चालवला जाणार होता आणि त्यामुळे तिला शिक्षादेखील होऊ शकते.
कार्डी बी ही मूळची न्यूयॉर्क सिटीची रॅपर आहे. तिचं खरं नाव बेल्कॉल्स अलमॅन्झर आहे. तिच्यावर ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या भांडणांच्या दोन प्रकरणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. यातील इतर 10 खटले फेटाळण्यात आले आहेत. यासोबतच दोन आरोपींनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. कार्डी बीवर लॉस एंजिल्स स्ट्रिप क्लबच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.
बारटेंडरसोबत झालेल्या या हाणामारीत खुर्च्या, बाटल्या आणि हुक्क्याच्या पाईपने मारहाण करण्यात आलं होतं. यामध्ये कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली होती. क्वीन्स डिस्ट्रिक्टच्या ॲटर्नी कार्डी बीला दोषी ठरवत म्हणाल्या की कोणतीही व्यक्ती कायद्याच्या वर नाही. त्यामुळे तिच्या शिक्षेच्या बदल्यात समाजसेवा करण्याचा करार मान्य करण्यात आला. विशेष म्हणजे 2019 मध्ये कार्डी बीने असा कोणताही करार स्वीकारण्यास नकार दिला होता.
“मी काही वाईट निर्णय घेतले होते, ज्यांचा सामना करण्यास मी आता घाबरत नाही. मला माझ्या दोन्ही मुलांसमोर एक चांगला आदर्श ठेवायचा आहे. मला माझे चाहते आणि संगीतावर लक्ष केंद्रित करायचं आहे,” असं तिने निवेदनात स्पष्ट केलं.