मुंबई : ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिलने नुकतीच बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. दरवर्षी रमजानच्या महिन्यात बाबा सिद्दिकी यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. या इफ्तार पार्टीला टेलिव्हिजनपासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी उपस्थित असतात. त्याचप्रमाणे या सेलिब्रिटींच्या भेटीगाठीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या या इफ्तार पार्टीतील शहनाज गिल आणि अभिनेत्री रश्मी देसाई यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या पार्टीत शहनाजने एण्ट्री घेताच बाबा सिद्दिकी यांच्याजवळ उभी असलेली रश्मी तिला दुर्लक्ष करत पुढे फोनवरून बोलू लागते. या व्हिडीओवरून रश्मीला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.
पापाराझींनी रश्मीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ‘रश्मी देसाईने शहनाज गिलला दुर्लक्ष केलं का?’, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. मात्र थोड्या वेळानंतर हा व्हिडीओ त्या अकाऊंटवरून डिलिट करण्यात आला. तोपर्यंत तो इतर ठिकाणी व्हायरल झाला होता.
रश्मी आणि शहनाज हे ‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात एकत्र स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. एकमेकींची चांगली ओळख असतानाही रश्मीने शहनाजला इर्ष्येमुळे दुर्लक्ष केल्याचं नेटकरी म्हणत आहेत. ‘रश्मी शहनाजवर जळते, म्हणूनच ती तिकडे पळून गेली’, असं एकाने लिहिलं. तर ‘जलकुकडी आहे ती’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘शहनाजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या इतर कलाकारांना तिच्याबाबत ईर्ष्येची भावना असेल’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
दरवर्षी बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या इफ्तार पार्टीला बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील असंख्य सेलिब्रिटी उपस्थित राहतात. रविवारी मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला सलमान खान, आयुष शर्मा, अर्पिता खान, पूजा हेगडे, नरगिस फाखरी, साजिद खान, उर्मिला मातोंडकर, जावेद जाफरी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, हुमा कुरेशी, इमरान हाश्मी यांनी हजेरी लावली होती.
शहनाज गिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून ती इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकणार आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश डग्गुबती, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू यांसह कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.