मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. कमी वयात तिने प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावले. ‘गुडबाय’ हा तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. मात्र त्यानंतर बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये रश्मिकाला आवर्जून पाहिलं जातंय. रश्मिकाचा आज (5 एप्रिल) 27 वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिचं नाव जोडलं जातं. मात्र रश्मिकाचा आधी साखरपुडा झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
रश्मिकाला देशभरातून प्रचंड प्रेम मिळत असलं तरी तिची लव्ह-लाइफ फारच गुंतागुंतीची राहिली आहे. रश्मिकाने अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता, असं म्हटलं जातं. मात्र साखरपुड्यानंतर या दोघांचं नातं टिकू शकलं नाही. रक्षित शेट्टीने ‘777 चार्ली’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. रक्षित आणि रश्मिकाच्या वयातही मोठा फरक होता. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर होतं. रश्मिकाने तिच्या पहिल्या चित्रपटाची सुरुवात रक्षितच्याच प्रॉडक्शन हाऊससोबत केली होती. ‘किरीक पार्टी’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार कम्पॅटिबिलिटीच्या समस्येमुळे या दोघांचं नातं तुटलं.
2017 मध्ये रश्मिकाने स्वत: रक्षितसोबतचं नातं जाहीर केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी साखरपुडा केला. मात्र 2018 मध्ये त्यांच्या नात्यात कटुता आली. अनेक प्रयत्न करूनही त्यांचं नातं टिकू शकलं नाही. हे नातं तुटण्यामागचं आणखी एक कारण असंही म्हटलं जातं की रश्मिकाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. मात्र याबद्दल दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
रश्मिकाने तिच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये ‘किरीक पार्टी’ या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने जवळपास 15 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे तिला देशभरात प्रसिद्धी मिळाली.