‘ॲनिमल’मधील करवा चौथच्या सीनवरून झालेल्या ट्रोलिंगवर अखेर रश्मिका मंदानाने सोडलं मौन

| Updated on: Apr 05, 2024 | 8:18 AM

'ॲनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानासोबतच अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाने जगभरात तब्बल 900 कोटी रुपयांची कमाई केली होती.

ॲनिमलमधील करवा चौथच्या सीनवरून झालेल्या ट्रोलिंगवर अखेर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
Rashmika Mandanna and Ranbir Kapoor
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. इतकंच नव्हे तर या चित्रपटावरून सोशल मीडियावर बरीच चर्चादेखील झाली. ‘ॲनिमल’मध्ये रश्मिकाने रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यातील करवा चौथच्या दृश्यावरून नेटकऱ्यांनी रश्मिकाला जोरदार ट्रोल केलं होतं. या सीनमध्ये ज्याप्रकारे ती रणबीरवर रागावते आणि त्यानंतर दातओठ चावून डायलॉग म्हणते, त्यावरून अनेकांनी तिच्या अभिनयकौशल्याची खिल्ली उडवली होती. रश्मिकाला खरंच अभिनय येतो का, असाही सवाल काहींनी केला. या ट्रोलिंगवर आता तिने मौन सोडलं आहे. रश्मिकाने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

रश्मिका म्हणाली, “करवा चौथचा सीन नऊ मिनिटांचा होता. तो सीन शूट करताना सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आवडला होता. नऊ मिनिटांचा सीन शूट केल्यानंतर सेटवर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. सीन खूप चांगल्याप्रकारे शूट झाला, असं ते म्हणत होते. मात्र जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा त्या सीनमधील एका विशिष्ट डायलॉगवरून लोकांनी मला प्रचंड ट्रोल केलं. तेव्हा मी विचार केला की, नऊ मिनिटांचा एवढा लांब सीन सेटवरील सर्वांना खूप आवडला होता, मात्र लोक आता त्यावरून का ट्रोल करत आहेत? मीच स्वत:भोवती कोणता फुगा फुगवून घेतला होता का? लोकांना तो सीन खरंच आवडला नाही का? कारण तुम्ही जे काही शूट केलंय, ते लोकांना माहित नसतं. त्यांनी फक्त तो 10 सेकंदांचा डायलॉग पाहिला आणि त्यावरून टीका करण्यास सुरुवात केली.”

हे सुद्धा वाचा

“मला माझ्या आयुष्यात अशा फुग्यात राहायचं नाही. मला जमिनीवर राहायचं आहे. मला लोकांशी बोलायचं आहे. वास्तवात त्यांना काय वाटतंय आणि काय चर्चा आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे. लोकांनी महिलेच्या शरीरावरून ट्रोलिंग करणं मला आवडत नाही. जर ते शक्य नसेल तर मग ते माझ्या चित्रपटांवरून, चित्रपटांमधील माझ्या चेहऱ्यावरून किंवा डायलॉगवरून ट्रोल करू लागतात. तो परफॉर्मन्स नेमका कसा होता, हे मला माहित आहे. कारण मी ते पाच महिन्यांपूर्वीच शूट केलंय”, असं ती पुढे म्हणाली.