आपल्या खास मैत्रिणीचं लग्न म्हटलं की नट्टापट्टा, शॉपिंग, साड्यांची खरेदी हे ओघाने आलंच. 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने नुकतीच तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
रश्मिकाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या आणि तिच्यासोबत असलेल्या इतर तरुणींच्या साडीच्या विशेष स्टाइलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. रश्मिकाने नेसलेल्या साडीच्या या स्टाइलबद्दल नेटकऱ्यांमध्ये कुतुहल निर्माण झालं.
रश्मिका आणि तिच्या मैत्रिणींनी कुर्गी स्टाइलमध्ये ही साडी नेसली आहे. या प्रकाराला कोडवा साडी असंही म्हणतात. खास कर्नाटकी स्टाइल म्हणून ही साडी ओळखली जाते. कर्नाटकात सणावाराला, लग्नात, पारंपरिक कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीची साडी नेसली जाते.
कुर्गी स्टाइल साडी नेसताना पदर डाव्या खांद्यावरून सोडला जात नाही, तर तो पुढून गुंडाळून मागून उजव्या खांद्यावर घेतला जातो. साडी नेसण्याची ही खूपच वेगळी पद्धत आहे.
विशेष म्हणजे या पद्धतीने साडी नेसताना निऱ्या मागच्या बाजूने खोचल्या जातात. एरव्ही साडीच्या निऱ्या या पुढे कमरेला खोचल्या जातात.