द्रष्टे उद्योगपती, दानवीर आणि टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आपल्या प्रकृतीस धोका नसल्याचं त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. परंतु बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालविल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी निवेदनाद्वारे जाहीर केली. रतन टाटा यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशातच रतन टाटा यांची जुनी मैत्रीण आणि पूर्व प्रेयसी सिमी गरेवाल यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलंय.
सिमी गरेवाल यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर रतन टाटांसाठी पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. ‘ते म्हणतायत की तुम्ही गेलात. तुम्ही गेल्याचं दु:ख पचवणं खूप कठीण आहे.. खूप जास्त. तुला निरोप मित्रा’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा आणि रतन टाटांचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. सिमी गरेवाल आणि रतन टाटा यांच्यात खूप खास नातं होतं. याविषयी 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द सिमी गरेवाल व्यक्त झाल्या होत्या. रतन टाटांचं कौतुक करत त्या म्हणाल्या होत्या, “रतन आणि मी खूप मागे निघून गेलो. ते परफेक्शन आहेत, त्यांची विनोदबुद्धी खूप चांगली आहे. ते विनम्र आणि परफेक्ट जेंटलमन आहेत. त्यांच्यासाठी पैसा हा कधीच ड्रायव्हिंग फोर्स नव्हता. ते भारतात तितक्या सहजतेने राहत नाही, जितकं ते परदेशात राहतात.”
They say you have gone ..
It’s too hard to bear your loss..too hard.. Farewell my friend..#RatanTata pic.twitter.com/FTC4wzkFoV— Simi_Garewal (@Simi_Garewal) October 9, 2024
रतन टाटा यांच्या निधनाने देशातील आदर्श, सभ्य, शालीन व्यक्तीमत्त्वाचा उद्योगपती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक भान जपतानाच टाटा उद्योग समुहाला नेटकं स्वरुप देण्याचं आणि वाढविण्याचं श्रेय रतन टाटा यांचंच आहे. भारतीय उद्योग विश्वातील ‘प्रेमळ, सोज्वळ व्यक्तिमत्त्व’ अशी त्यांची ओळख होती. ‘टाटा म्हणजे सचोटी’ हे समीकरण दृढ करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय मानसिकतेला साद घालणारा सज्जन उद्योगपती अशी त्यांची ओळख होती.