मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांची पहिली भेट एका नाटकाच्या तालमीदरम्यान झाली होती. नाटकात काम करता – करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1982 मध्ये लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रत्ना त्यांच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. नसीरुद्दीन शाह यांच्या भूतकाळामुळे कधीच फरक पडला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट कलं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत रत्ना यांनी शाह यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितलं.
“आम्ही एकत्र एका नाटकात काम करत होतो. संभोग से संन्यास तक असं त्या नाटकाचं नाव होतं. नाटकात काम करता करता आम्हाला हे कळून चुकलं होतं की, आम्हाला एकत्र राहायचंय. आम्ही दोघंही वेडे होतो, त्यामुळे एकमेकांना आम्ही फारसे प्रश्न विचारले नाही. आजच्या काळात लोकं अनेक योग्य प्रश्न विचारतात. आम्ही फक्त इतकाच विचार केला होता की, हे चांगलं वाटतंय, करून पाहू. सुदैवाने तेच आमच्यासाठी योग्य होतं. ते सर्व अत्यंत आश्चर्यकारक होतं. त्यासाठी मी कुठलंही श्रेय घेणार नाही. पण दोघांमधील गोष्टी योग्यरित्या घडून आल्या होत्या”, असं त्या म्हणाल्या.
रत्ना पाठक यांच्याआधी नसीरुद्दीन शाह यांचं पहिलं लग्न झालं होतं. पतीच्या भूतकाळाविषयी त्या पुढे म्हणाल्या, “मला त्यांच्या भूतकाळाविषयी काहीच चिंता नव्हती. मी फक्त प्रेमात होते. ते त्यांच्या पूर्व पत्नीपासून फार आधीच विभक्त झाले होते. त्यानंतरच्या काळात ते बऱ्याच रिलेशनशिप्समध्येही होते. मात्र तोसुद्धा त्यांचा भूतकाळच होता. मग त्यांच्या आयुष्यात मी आले. जोपर्यंत मी त्यांच्या आयुष्यातील अखेरची असेन, तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही.”
“लग्नाच्या एक आठवड्यानंतर आम्ही हनिमूनला गेलो होतो आणि तिथूनही आम्हाला मधेच परतावं लागलं होतं. कारण त्यांना जाने भी दो यारो या चित्रपटासाठी शूटिंग करायची होती. त्यानंतर बरेच दिवस आमची भेटसुद्धा झाली नव्हती. ते सर्वांत उत्तम आणि कठीण शूट होतं. नसीर तीन दिवसांनंतर यायचे आणि त्यांच्याबद्दल मला कोणतीच माहिती नसायची. ती वेळच खूप वेगळी होती”, असं रत्ना पाठक यांनी सांगितलं.