अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार ही जोडी नव्वदच्या दशकात तुफान चर्चेत होती. रवीना आणि अक्षयचं अफेअर इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर रवीना याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अक्षयसोबत साखरपुडा मोडल्यानंतर रवीनाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं गेलं होतं. या सर्व चर्चांवर रवीनाने प्रतिक्रिया दिली आहे. ब्रेकअपच्याच काळात दोन मुलींना दत्तक घेण्याच्या निर्णयाबद्दलही तिने मौन सोडलंय. आता तब्बल 20 वर्षांनंतर अक्षय आणि रवीना ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाला तिचा साखरपुडा मोडल्यानंतर झालेल्या चर्चांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या चर्चांवर आता तुला कधी हसू येतं का, असा सवाल रवीनाला केला. त्यावर ती म्हणाली, “अर्थात, यात कोणती मोठी गोष्ट आहे? अनेकांचे ब्रेकअप्स होतात, लोक आयुष्यात पुढे निघून जातात, कधीकधी त्यांच्यात चांगली मैत्रीही असते. पार्टनर म्हणून आम्ही एकमेकांसाठी चांगले नव्हतो पण मित्र म्हणून खूप चांगले आहोत, हे नंतर लक्षात येतं. यात कोणती मोठी गोष्ट आहे? मला हेच समजत नाही. मी पूर्णपणे ठीक होते. मीडियाने ते प्रकरण वाढवलं होतं. कारण त्याकाळी लोकांना मासिकांच्या खपण्याची चिंता असायची. माझे कुटुंबीय, जवळच्या मित्रमैत्रिणी काय विचार करतात, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. एका ठराविक मर्यादेनंतर, लोक काय विचार करतात याने मला फरक पडत नाही.”
ब्रेकअपनंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या चर्चांवर रवीना पुढे म्हणाली, “सेलिब्रिटींबद्दल काय काय लिहिलं जाईल याचा काहीच नेम नव्हता आणि त्यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं. त्या सर्व परिस्थितीदरम्यान मी दोन मुलींना दत्तक घ्यायचं ठरवलं होतं. या दोघींना त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगायला मिळत नव्हतं. हे सर्व माझ्या घराजवळच घडत होतं. त्यामुळे त्यांची जबाबदारी मी उचलण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 21 व्या वर्षी मी त्यांना घरी आणलं. माझ्यासमोर असं काही घडत असेल तर मी ते फक्त पाहत उभी राहू शकत नाही. माझा मूळ स्वभावच असा आहे. मी कामावर असताना माझ्या आईवडिलांनी त्यांचा सांभाळ केला. नंतर जेव्हा पती अनिल थडानीसोबत मला मुलं झाली, तेव्हा त्यांनी भावंडांप्रमाणे त्यांची काळजी घेतली.”