मुंबई : 11 डिसेंबर 2023 | झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या दोघींसोबतच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यानेसुद्धा सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. काहींना हा चित्रपट आवडला तर काही जणांनी सुहाना, खुशी आणि अगस्त्य या स्टारकिड्सच्या अभिनयाची खिल्ली उडवली. या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी काही हास्यास्पद मीम्ससुद्धा तयार केले आहेत. असाच एक मीम अभिनेत्री रवीना टंडनने लाइक केला होता. या मीममध्ये अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली होती. मात्र या लाइकवरून आता रवीनाने स्पष्टीकरण दिलं आहे. मीमवरील लाइक चुकून झाल्याचं तिने म्हटलंय.
‘टच बटण आणि सोशल मीडिया. एका प्रामाणिक चुकीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं. संबंधित पोस्ट माझ्याकडून चुकून लाइक केली गेली आणि स्क्रोलिंग करताना लाइकचं बटण माझ्याकडून प्रेस झाल्याचं मला समजलंही नाही. यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागते’, असं रवीनाने स्पष्ट केलंय.
‘द आर्चीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुखची मुलगी सुहाना, बिग बींचा नातू अगस्त्य आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी यांच्या अभिनयकौशल्याची थट्टा केली जात आहे. अशाच एका मीमवर रवीना टंडनने प्रतिक्रिया दिली होती. हा मीम खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांचा होता. ‘इथेच अभिनयाचं निधन झालं’, असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. या मीमला रवीनाने लाइक केलं होतं. त्यामुळे रवीनासुद्धा नेटकऱ्यांशी सहमत असल्याचा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झोया अख्तर घराणेशाहीच्या टीकेवर मोकळेपणे व्यक्त झाली. “घराणेशाही तेव्हा होते जेव्हा मी लोकांचा पैसा किंवा कोणा दुसऱ्यांचा पैसा घेते आणि तो मी माझ्या मित्रांवर, कुटुंबीयांवर खर्च करते. जर मी माझा पैसा स्वत:च खर्च करतेय, तर त्याला घराणेशाही नाही म्हणू शकत. मी माझ्या पैशांचं काय केलं पाहिजे, हे सांगणारे तुम्ही कोण? हा माझा पैसा आहे. जर उद्या मी माझा पैसा माझ्या भाचीवर खर्च करु इच्छिते तर ही माझी समस्या आहे”, अशा शब्दांत तिने सुनावलं होतं.