मुंबई- वयाच्या 46 व्या वर्षीही अभिनेत्री रवीना टंडनचं सौंदर्य आणि फिटनेस तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे. रवीनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते कित्येक प्रयत्न करतात. मात्र काही चाहत्यांमुळे सेलिब्रिटींनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने एका चाहत्याबद्दल खुलासा केला. तिच्यासाठी त्या चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
“गोव्याच्या एका चाहत्याने वेडेपणाची हद्दच पार केली होती. तो स्वत:ला माझा पती आणि माझ्या मुलांना आपली मुलं म्हणायचा. त्याचं आणि माझं लग्नच झालंय असं तो मानायचा. इथपर्यंतही ठीक होतं, पण त्याने एकदा त्याच्या रक्ताने भरलेली बॉटल मला कुरिअर केली होती. फक्त बॉटल्सच नाही तर रक्ताने लिहिलेलं पत्र आणि अश्लील फोटोसुद्धा मला पाठवायचा”, असं रवीनाने सांगितलं.
रवीना पुढे म्हणाली, “असाच आणखी एक चाहता होता. तो तर सतत माझ्या घराबाहेर बसलेला असायचा. एकदा त्याने माझ्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझे पती अनिल थडानी कारमध्ये बसले होते आणि त्यांच्यावर कोणीतरी मोठं दगड फेकलं. आम्ही खूप घाबरलो होतो. त्यानंतर आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला.”
सेलिब्रिटींसाठी अनेकदा चाहतेच कसे डोकेदुखी ठरतात, याविषयी रवीनाने मुलाखतीत सांगितलं. रवीनाने 2004 मध्ये फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीशी लग्न केलं. या दोघांना रणबीर आणि राशा ही दोन मुलं आहेत.
रवीनाने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर तिने मोहरा, दिलवाले, लाडला, अंदाज अपना अपना यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. गेल्या वर्षी तिने ‘अर्णायक’ या क्राइम थ्रिलरद्वारे ओटीटीवर पदार्पण केलं.