ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद सध्या त्यांच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत अभिनेते किरण कुमारसुद्धा आहेत. या दोघांच्या हातात दारूचा ग्लास पहायला मिळतोय. दारूचा ग्लास हातात घेऊन हे दोघं नाचताना दिसत आहेत. त्यावरूनच काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मुस्लीम असून रमजानच्या महिन्यात दारू पित आहात, हे खूप चुकीचं आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यावर अखेर रझा मुराद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘दोस्त जितने पुराने, यारी उतनी ही सॉलिड (मित्र जितके जुने, मैत्री तितकीच पक्की). कधीकधी जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काम करता, तेव्हा रिल आणि रिअल यांच्यातील अंतर मिटून जातं’, असं कॅप्शन देत किरण कुमारकेय, राजू खेर आणि रझा मुराद यांनी एकत्र हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली.
‘माफ करा सर, परंतु रमजानच्या पवित्र महिन्यात तुम्ही हे सर्व करू नये’, असं एकाने लिहिलं. तर ‘रमजानच्या महिन्यात रझा मुराद दारू का पित आहेत’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘तुम्ही तर खूप समजुतदार आहात, मग रमजान महिन्यात दारू का पित आहात’, असंही तिसऱ्याने विचारलं. या ट्रोलिंगनंतर रझा मुराद यांनी कमेंट करत आपली बाजू मांडली.
‘प्लीज प्लीज प्लीज.. हे समजू नका की हे कोणती दारूची किंवा वाढदिवसाची पार्टी सुरू आहे. ही प्रॉडक्शनच्या टप्प्यात असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची क्लिक आहे, जी काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या छत्तरपूरमध्ये पार पडली. या चित्रपटात माझ्या वाढदिवसाचा एक सीन होता. क्लिपमधील हे दृश्य चित्रपटातील आहे. तुम्ही उगाच समजताय की ही दारूची पार्टी चालू आहे. माझा वाढदिवस 23 नोव्हेंबर रोजी असतो आणि हा मार्च महिना सुरू आहे. कसलाच विचार न करता तुम्ही समजताय की रमजानमध्ये मी असं सर्वांसमोर दारू पितोय, जे खूप चुकीचं आहे. हे फक्त चित्रपटाच्या शूटिंगमधील दृश्य आहे, बाकी काही नाही’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.