आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. मात्र पहिल्या भागात चित्रपटाची कथा संपल्यानंतरही आता ‘धर्मवीर 2’ का प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता निर्माते मंगेश देसाई यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
“आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या एका भागातून दाखवणं शक्य नव्हतं. ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब जगभरात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हे ही सर्वांना समजलं. त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, त्यामुळेच आम्ही ‘धर्मवीर 2’ करण्याचं ठरवलं,” असं उत्तर त्यांनी दिलं.
याविषयी ते पुढे म्हणाले, “‘धर्मवीर’ चित्रपटाच्या वेळी माझ्या मोबाइलच्या वॉलपेपरवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता. कालांतराने मी तो बदलला. काही केल्या मनात इच्छा असूनही ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या गोष्टी जुळून येत नव्हत्या. शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली आणि ‘धर्मवीर 2’ चित्रपट करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला खरं वाटणार नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी या अचानकपणे लगेच जुळून आल्या आणि ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजेच आजही दिघे साहेब हे आपल्या आजूबाजूला असल्याची प्रचिती मला यातून मिळाली.”
‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या टीझरला दमदार प्रतिसाद मिळाला. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडेंनीच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन केलंय.