मुंबई : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्यावर आणि अदांवर आजही लाखो चाहते घायाळ आहेत. रेखा यांच्या सौंदर्यापुढे आजच्या तरुण अभिनेत्रीही फिक्या पडतील. त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेत आल्या आहेत. तरीसुद्धा त्यांच्या कुटुंबीयांबद्दल चाहत्यांना फार क्वचित माहिती असेल. रेखा यांच्या सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. अभिनेते जेमिनी गणेशन हे रेखाचे वडील होते आणि त्यांनी तीन वेळा लग्न केलं होतं. जेमिनी गणेशन यांना पहिल्या पत्नीपासून चार मुली, दुसरी पत्नी पुष्पावल्लीपासून दोन मुली आणि तिसरी पत्नी सावित्रीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. या भावंडांमध्ये रेखा यांची एकच सख्खी बहिण आहे. राधा असं त्यांच्या सख्ख्या बहिणीचं नाव आहे.
रेखा यांच्याप्रमाणेच राधासुद्धा त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आज राधा या ग्लॅमर विश्वापासून दूर असल्या तरी एकेकाळी ज्या प्रसिद्ध मॉडेल होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्याचसोबत काही प्रसिद्ध मासिकांसाठी फोटोशूटसुद्धा केलं होतं. मात्र राधा यांना अभिनयापेक्षा जास्त मॉडेलिंगमध्ये रस होता.
काही रिपोर्ट्सनुसार, राज कपूर यांनी सुरुवातीला ‘बॉबी’ या चित्रपटाची ऑफर राधा यांना दिली होती. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत राधा यांची मुख्य भूमिका असावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र राधा यांनी ही ऑफर नाकारली. त्यानंतर डिंपल कपाडिया यांनी ‘बॉबी’मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं. बॉबी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामुळे डिंपल कपाडिया रातोरात स्टार बनल्या. त्यामुळे या एका चुकीमुळे राधा यांच्या हातून ‘बॉबी’सारख्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर गेली आणि त्यामुळे डिंपल कपाडिया स्टार झाल्या.
1981 मध्ये राधा यांनी ग्लॅमर विश्वाला रामराम केला. बालमित्र उस्मान सईद यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी मॉडेलिंग करणं सोडून दिलं. लग्नानंतर त्या पतीसोबत अमेरिकेला राहायला गेल्या. उस्मान हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एम. अब्बास यांचे पुत्र आहेत. राधा आणि उस्मान यांना दोन मुलं आहेत आणि या दोघांचीही लग्न झाली आहेत.