रेणुकास्वामीच्या हत्येच्या घटनेला 80 पेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी अखेर बुधवारी आरोपपत्र दाखल केलं. कन्नड चित्रपट अभिनेता दर्शन थुगूदीपा, त्याची मैत्रीण पवित्रा गौडा आणि इतर 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हे सर्वजण कर्नाटकातील विविध तुरुंगात कैद आहेत. पोलिस उपायुक्त (पश्चिम) एस. गिरीश यांनी याबाबतची माहिती दिली. 3991 पानांचं हे आरोपपत्र असून त्यासोबत फॉरेन्सिक अहवालसुद्धा अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर सादर करण्यात आले. पोलिसांच्या मते रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणात पवित्रा गौडा ही आरोपी क्रमांक 1 आणि दर्शन हा आरोपी क्रमांक 2 आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन प्रत्यक्षदर्शी आणि 27 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. 11 जून रोजी दर्शन थुगूदीपा आणि त्याची मैत्रीण पवित्रा गौडासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती. चित्रदुर्ग याठिकाणी राहणाऱ्या रेणुकास्वामी या हत्येप्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनसोबत कथितपणे रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री पवित्रा गौडाला रेणुकास्वामीने अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले होते. याच रागातून दर्शनने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. दर्शन सतत मारेकऱ्यांच्या संपर्कात होता आणि रेणुकास्वामीचं अपहरण करून सर्वांत आधी त्याच्याकडेच नेण्यात आलं होतं. रेणुकास्वामीच्या हत्येआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली असून सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
रेणुकास्वामीचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडाच्या रॉडने दिलेल्या चटक्याचे व्रण दिसून आले. त्याची नाक आणि जीभसुद्धा कापण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर रेणुकास्वामीचा जबडासुद्धा तोडण्यात आला होता. त्याच्या संपूर्ण शरीरातील असंख्य हाडं मोडलेली होती. रेणुकास्वामीच्या डोक्यालाही बराच मार होता. रेणुकास्वामी चित्रदुर्गमधील एका मेडिकल शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. चार्जशीटमध्ये असंही म्हटलंय की रेणुकास्वामीच्या प्रायव्हेट पार्टला इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी आरोपींनी मेगर मशीनचा वापर केला होता. या मशीनचा वापर इन्सुलेशन प्रतिकारशक्ती मोजण्यासाठी केला जातो.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुकास्वामीच्या हत्येसाठी आरोपी क्रमांक 1 म्हणजेच पवित्रा गौडा मुख्य कारण होती. तपासादरम्यान हे स्पष्ट झालं की तिनेच दुसऱ्या आरोपींना प्रवृत्त केलं, त्यांच्यासोबत कट रचला आणि गुन्ह्यात सामील झाली.