Sushant Singh Rajput Death Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू संबंधी मोठी माहिती समोर आली आहे. सीबीआयने अभिनेत्याच्या केस संबंधी क्लोजर रिपोर्ट सादर करत अभिनेत्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लोजर रिपोर्ट दाखल केले आहेत. अभिनेत्याचे वडील केके सिंग यांनी दाखल केलेला एक खटला सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याशी संबंधित आहे, तर दुसरा खटला अभिनेत्याची कथित मैत्रीण रिया चक्रवर्तीने त्याच्या बहिणींविरुद्ध दाखल केला आहे.
सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या खटल्यात सीबीआयने पाटणा येथील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला, तर दुसऱ्या प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. सीबीआयने सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ आता न्यायालय स्वीकारेल की मृत्यू प्रकरणी पुढील तपास करण्याचे आदेश देईल.. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे..
सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सर्व बाजूंनी योग्य तपास करून अचूक रिपोर्ट सादर केल्यामुळे आभार… सर्व बाजूंनी सखोल तपास करून प्रकरण बंद केले. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर खोट्या बातम्या पसरवणे पूर्णपणे अयोग्य आहे…’ असं देखील अभिनेत्रीचे वकील म्हणाले.
सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी पाटण्यात रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासोबतच त्याने अभिनेत्रीवर फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोपही केला होता.
सुशांत कुटुंबियांकडून गंभीर आरोप झाल्यानंतर रिया हिने देखील तक्रार दाखल केली. ज्यामध्ये अभिनेत्रीने सुशांतच्या कुटुंबीयांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेता फक्त 34 वर्षाचा होता. कूपर हॉस्पिटलमध्ये झालेल्या पोस्टमॉर्टममध्ये अभिनेत्याचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोणीही अभिनेत्याला मृत्यूसाठी प्रवृत्त केलं नाही. कोणीही अभिनेत्याचा गळा दाबला नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्यावर विषप्रयोग देखील झालेला नाही… असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं असून अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे… असं सांगण्यात आलं आहे.