जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप झाले होते. सुशांतला ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली रियाला तुरुंगातही राहावं लागलं होतं. जवळपास महिनाभरानंतर जामिनावर तिची सुटका झाली होती. रियासोबतच तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसुद्धा भायखळ तुरुंगात महिनाभर कैद होता. या कठीण काळात जवळच्या मित्रमैत्रिणींनी आईवडिलांची कशा पद्धतीने काळजी घेतली, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रियाला तिच्या आईवडील आणि मित्रमैत्रिणींविषयी आश्चर्यकारक गोष्ट जाणवली. रिया म्हणाली की, “आईवडील आणि मित्रमैत्रिणींचं वजन वाढलेलं दिसत होतं. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा मला समजलं की, मी तुरुंगात असताना ते माझ्या आईवडिलांना नियमित भेटायला जायचे. अगदी जवळचे मित्रमैत्रिणी माझ्या आईवडिलांसोबत जेवायला बसायचे, प्रसंगी ड्रिंक्सही करायचे. मित्रमैत्रिणींची एक जोडी माझ्या कुटुंबीयांच्या खूप जवळची आहे. मी आणि माझा भाऊ तुरुंगात असताना ते कपल दररोज रात्री माझ्या बाबांसोबत जेवायला आणि ड्रिंक्स करायला यायचे.”
“मी जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांना पाहून मला आश्चर्यच वाटलं होतं. तुमचं वजन इतकं कसं वाढलं, असा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा मला हे सगळं समजलं होतं. मी त्या मित्रमैत्रिणीला मस्करीत म्हटलं की, नालायकांनो.. मी तिथे तुरुंगात होती आणि तुम्ही इथे मस्तपैकी जेवताय, वजन वाढवताय. त्यावर ते म्हणाले, असं काही नाही. काका आणि काकी यांनी नॉर्मल राहावं, वेळेवर जेवावं म्हणून आम्ही दररोज त्यांच्याकडे जायचो. अशा पद्धतीने त्यांनी माझी साथ दिली”, असं तिने पुढे सांगितलं.
“माझ्या अवतीभोवती जणू सुपरवुमन्सच होत्या. तुमच्या आयुष्यात एक जरी खरी मैत्रीण किंवा मित्र असला तरी ते पुरेसं असतं. तुम्हाला बाकी कोणत्याच गोष्टीची गरज नसते. माझ्यासाठी शिबानी दांडेकर तशी मैत्रीण आहे. ज्या पद्धतीने ती माझ्या बाजूने उभी राहिली, ते माझ्यासाठी सर्वस्व होतं. हे संपूर्ण जग माझ्याविरोधात जाऊ शकतं, पण ती माझ्या बाजूने कायम उभी राहील, याची मला खात्री होती”, असं रिया म्हणाली. रिया सध्या ‘झेरोधा’चा संस्थापक निखिल कामतला डेट करत असल्याची चर्चा आहे.