अभिनेत्री रिचा चड्ढाने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली. रिचा आणि अली फजल लवकरच आई-बाबा होणार आहेत. ऑगस्ट महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. त्यापूर्वी रिचा आणि अलीने खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो रिचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचसोबत पोस्टवरील कमेंट सेक्शन तिने बंद ठेवलंय. यामागचं कारणसुद्धा रिचाने सांगितलं आहे.
प्रेग्नंसी फोटोशूट शेअर करत रिचाने लिहिलं, ‘प्रकाशाच्या किरणाशिवाय इतकं निर्मळ प्रेम या जगामध्ये कोण आणू शकतं? अली फजल, या आयुष्यातील अविश्वसनीय प्रवासात माझा जोडीदार बनल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशाचा योद्धा, करुणा, सहानुभूती आणि प्रेमाचा अंश आपण या जगात आणुयात.’ या पोस्टच्या अखेरीस रिचाने स्पष्ट केलं की तिने कमेंट्स ऑफ केले आहेत. म्हणजेच तिच्या या पोस्टवर कोणीच कमेंट करू शकणार नाही. ‘ही सर्वांच प्रायव्हेट गोष्ट मी पोस्ट करत असल्याने कमेंट्स बंद केले आहेत’, असं तिने लिहिलं आहे.
‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर हळूहळू प्रेमात झालं. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान रिचा आणि अलीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. रिचा आणि अली यांचा धर्म वेगळा असून लग्नाच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्या का, याविषयी तिने एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. “तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल जर ठाम राहिलात आणि तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले तर बाकी कोणत्याच गोष्टींनी फरक पडत नाही. माझ्या मते माणूस हा सर्वांत आधी माणूस असतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता, तेव्हा त्यात कोणतेच फिल्टर्स नसतात. तुम्ही प्रेमात असता, तेव्हा प्रेम ही एकच भावना महत्त्वाची असते,” असं ती म्हणाली होती.
‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’च्या प्रीमिअरसाठी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये जायचं होतं, तेव्हा तिने आणि अलीने त्यांचं रिलेशनशिप जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. “मला अलीसोबत व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये जायचं होतं. आमच्यासोबत इंग्लिश अभिनेत्री जुडी डेंचसुद्धा येणार होत्या. त्यामुळे जगाचा विचार करून मी तो क्षण गमावणार नाही, हे मी अलीला स्पष्ट केलं होतं. त्यावर त्याचं म्हणणं होतं की अजून आपण कोणालाच नात्याविषयी सांगितलं नाही. तेव्हा मी म्हटलं की, चल सांगुयात. हीच योग्य वेळ आहे”, असं रिचाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.