अभिनेते ऋषी कपूर यांचं 2020 मध्ये पहिल्या लॉकडाऊनदरम्यान कॅन्सरने निधन झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांची मुलगी रिधिमा कपूर वडिलांच्या अखेरच्या दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. माझे वडील आयुष्य भरभरून जगणाऱ्या व्यक्तींपैकी होते. त्यामुळे जेव्हा ते आजारी पडले, तेव्हा ती गोष्ट स्वीकारणंच आमच्यासाठी खूप कठीण होतं, असं रिधिमा म्हणाली. या मुलाखतीत ऋषी कपूर यांचा जावई भरत सहानीसुद्धा रिधिमासोबत उपस्थित होता. तो म्हणाला, “त्यांना फक्त एकच गोष्ट करायची मनापासून इच्छा होती, ती म्हणजे कॅमेरासमोर जाणं आणि चित्रपट बनवणं. न्यूयॉर्कमध्ये जेव्हा ते रुग्णालयात होते, तेव्हासुद्धा त्यांच्या मनात हाच विचार होता की मी पुन्हा काम करू शकेन का? मला लोक त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी देतील का? ज्या चित्रपटांचं काम मी सुरू केलंय, ते मी पूर्ण करू शकेन का?”
ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माची नमकीन’ हा ठरला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते वैद्यकीय देखरेखीखाली होते. आरोग्यावर अधिक परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी शूटिंगचा ताण घेऊ नये अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण तेव्हासुद्धा ते दिल्लीत शूटिंग करत होते आणि स्ट्रिटफूडचा आनंद घेत होते, असं रिधिमाने सांगितलं. “त्या परिस्थितीत त्यांनी काम करावं अशी आमची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी जास्तीत जास्त आराम करावा, यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या मागे लागलो होतो. दिल्लीतील प्रदूषण पाहता त्यांच्यासाठी ते वातावरणसुद्धा सुरक्षित नव्हतं. पण त्यांनी कधीच आमचं ऐकलं नाही. ते दिल्लीतील स्ट्रिटफूडचाही मनसोक्स आस्वाद घेत होते”, असं ती पुढे म्हणाली.
ऋषी कपूर हे कॅन्सरच्या उपचारासाठी पहिल्यांदा 2018 मध्ये न्यूयॉर्कला गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये ते भारतात परतले, तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होती. पण काही काळानंतर पुन्हा कॅन्सरमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. “त्यांना पुन्हा कॅन्सरने ग्रासलं होतं. उपचारानंतर थोड्या वेळातच त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला होता. त्यावेळी तो आजार आणखी तीव्र झाला होता. आम्ही दिवाळीला सर्वजण एकत्र होतो, एकत्र बाहेर गेलो. त्या आजारपणातही ते खूप उत्साही होते. ते सर्वांसोबत खूप खुश होते. त्यांनी दिवाळीच्या सर्व पार्ट्यांना हजेरी लावली होती. आम्ही सर्वांनी एकत्र दिवाळी साजली केली आणि त्याच्या काही महिन्यांतच ते पुन्हा रुग्णालयात दाखल झाले”, असं रिधिमाने सांगितलं.
त्यावेळी अनेकांनी ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांना ट्रोल केलं होतं. या मुलाखतीत रिधिमाने त्या ट्रोलर्सना उत्तर दिलं. “ती वेळ आम्हा कुटुंबीयांसाठी खूप वाईट होती. तेव्हा अनेकजण म्हणत होते की ते दु:खी आहेत असं दिसत नाहीये. पण आम्ही काय सहन करत होतो, हे आम्हालाच माहीत होतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. जेव्हा ऋषी कपूर यांचं निधन झालं तेव्हा त्यांची मुलगी रिधिमा दिल्लीत होती आणि वडिलांच्या अंत्यविधीला ती उपस्थित राहू शकली नव्हती. त्यावेळी लॉकडाऊन असल्याने तिला प्रवासासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली होती. त्यामुळे वडिलांच्या पार्थिवावर अंत्यविधी झाल्यानंतर ती मुंबईत पोहोचली होती.