मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या ट्रेलरमध्ये शाहरुख पाच विविध लूकमध्ये पहायला मिळत आहे. त्याच्यासोबतच साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एकीकडे ‘जवान’मध्ये कलाकारांची मोठी फौज असताना दुसरीकडे त्यातल्या एका अभिनेत्रीच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जातात. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रिधी डोग्रा या चित्रपटात शाहरुखच्या आईच्या भूमिकेत आहे. शाहरुखच्या आईच्या भूमिकेसाठी रिधीचं वय खूप लहान असल्याने नेटकरी निर्मात्यांना ट्रोल करत आहेत.
तब्बल 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘जवान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने केलं आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पॅन इंडिया चित्रपटात 38 वर्षीय रिधी डोग्राने 58 वर्षीय शाहरुखच्या आईची भूमिका साकारली आहे. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये रिधी म्हातारपणाच्या लूकमध्ये दिसतेय. तिला अशा भूमिकेत पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
‘मी इतकी सुंदर आई याआधी पाहिली नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘हद्दच आहे, इतक्या सुंदर आणि कमी वयाच्या अभिनेत्रीला शाहरुखच्या आईची भूमिका दिली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. रिधी आणि शाहरुखच्या वयात जवळपास 20 वर्षांचं अंतर आहे. याआधी आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात अभिनेत्री मोना सिंगने आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी आमिर 58 आणि मोना 41 वर्षांची होती. या दोघांमध्येही जवळपास 17 वर्षांचं अंतर होतं. तेव्हासुद्धा नेटकऱ्यांनी मोनाच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रश्न रिधीबद्दल विचारला जात आहे.
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ‘जवान’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अटलीने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे.