मुंबई- ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. सुरुवातीला ‘कांतारा’ हा कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहून नंतर तो विविध भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘कांतारा’ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट हिंदीत डब केल्यापासून ऋषभला अनेकदा त्याच्या हिंदी रिमेकविषयी प्रश्न विचारण्यात येत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे.
“अशा पद्धतीची भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला तुमची संस्कृती आणि रुढी-परंपरांविषयी पूर्ण विश्वास असायला हवा. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मोठे कलाकार आहेत, जे मला आवडतात. पण मी मला रिमेकमध्ये काहीच रस नाही”, असं ऋषभ म्हणाला.
‘कांतारा’च्या ऑस्कर एण्ट्रीविषयी प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “मी त्याबद्दल आताच 25 हजार ट्विट्स पाहिले आहेत. मला त्याचा आनंद आहे. पण त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मी या यशासाठी काम केलं नाही. तर मी माझ्या कामासाठी काम केलं आहे.”
‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा बजेट फक्त 20 कोटी रुपये आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर आता त्याने जवळपास 250 कोटी रुपयांची कमाई केली आहे.